मुंबई : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी हत्याप्रकरणी न्याय मागण्यासाठी सर्वपक्षीय, सर्व धर्मीय जन आक्रोश मोर्चा आज मुंबईतील मेट्रो सिनेमा ते आझाद मैदानपर्यंत काढण्यात आला. या मोर्चाला मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते. केवळ मुंबईतीलच नाही तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक या मोर्चासाठी आलं होतं. या आधी बीड, परभणी, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, वाशिम, पैठण या जिल्ह्यांमध्ये जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आले होते.
मुंबईतील जन आक्रोश मोर्चावेळी काही मोर्चेकर्यांची प्रतिक्रिया घेतली. त्यावेळी त्यांनी सांगितले की, संतोष देशमुख यांची खंडणीसाठी तर, सोमनाथ सूर्यवंशी यांची पोलीस व्यवस्थेने हत्या केली आहे. या दोन्ही कुटुंबांना न्याय मिळाला पाहिजे. जोपर्यंत या दोन्ही प्रकरणातील आरोपींना फाशी होत नाही तोपर्यंत ही आंदोलने आणि मोर्चे सुरूच राहतील.
सरकारची दादागिरी चालणार नाही. आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात असलेला आरोपी संतोष आंधळे अजूनही फरार आहे. त्याला राजाश्रय मिळतोय. अशी प्रतिक्रिया काही मोर्चेकरांनी दिली. या मोर्चासाठी सरपंच संतोष देशमुख आणि परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांचे कुटुंब मुंबईत आले आहेत.
जन आक्रोश मोर्चानंतर आझाद मैदानावर सभा पार पडली. या सभेतून देशमुख आणि सूर्यवंशी कुटुंबीयांनी न्यायाची मागणी केली आहे. आतापर्यंत हे मोर्चे राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये सुरू होते. मात्र, आता हा मोर्चा राज्याच्या राजधानीत धडकला आहे. यावेळी बोलताना संतोश देशमुख यांची बहीण म्हणाली की, "माझ्या भावाचा खून होऊन दोन महिने झाले. अजून त्याला न्याय मिळालेला नाही. वैभवी आता बारावीमध्ये आहे. तिचं पुढचं शिक्षण आहे. लहान मुलगा आहे. आमचा लहान भाऊ आजारी आहे. तो सलाईन लावून या मोर्चात दाखल झाला आहे. असं असताना देखील अद्याप माझ्या भावाला न्याय मिळालेला नाही." "आम्हाला न्याय मिळायलाच हवा. मुख्यमंत्र्यांनी या दोन्ही प्रकरणात एकाही आरोपीला सोडणार नाही असं म्हटलं होतं. मुख्यमंत्र्यांनी आपला शब्द पाळायला हवा. या प्रकरणातील सर्व दोषींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. ही सर्व गुन्हेगारांची गँग आहे.
जोपर्यंत या प्रकरणातील सर्व आरोपी पकडले जात नाही तोपर्यंत आमचे मोर्चे सुरूच राहतील. या प्रकरणाचा जी यंत्रणा तपास करते त्या यंत्रणेवर आमचा विश्वास आहे. त्यांनी आम्हाला न्याय द्यावा. हीच आम्हाला अपेक्षा आहे. असं संतोष देशमुख यांचे लहान भाऊ धनंजय देशमुख यांनी आपल्या भाषणात म्हटलं. दरम्यान, सभेनंतर जन आक्रोश मोर्चाचे एक शिष्ट मंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी जाणार आहे. या भेटीत मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख व परभणीचे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येबाबत प्रशासनाने काय तपास केला? तपास कुठपर्यंत आला आहे? हे उघड करण्याची मागणी केली जाणार आहे.
हेही वाचा :