मुंबई - अभिनेता विक्रांत मॅसीनं सोमवारी अभिनयातून ब्रेक घेणार असल्याबद्दलचा आपला एक निर्णय सोशल मीडिया पोस्टमधून चाहत्यांना सांगितला होता. मात्र ही पोस्ट व्हायरल झाली आणि तो फिल्म इंडस्ट्रीतून 'निवृत्ती' घेत असल्याच्या चर्चेला उधाण आलं. याबाबत मंगळवारी विक्रांतनं अधिकृत निवेदन जारी करून स्पष्ट केले की लोकांनी त्याच्या पोस्टचा चुकीचा अर्थ लावला आहे. त्यानं असंही नमूद केलं की, बऱ्याच काळ काम केल्यानं शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवत आहे. म्हणून अभिनयातून तात्पुरती विश्रांती घेण्याबद्दल मी माझा विचार व्यक्त केला होता.
"मी अभिनयच करू शकतो. मला माझ्याकडे जे काही आहे ते अभिनयानंच दिलं आहे. माझ्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याला मोठा फटका बसला आहे. मला फक्त थोडा वेळ विश्रांती घ्यायची आहे, माझी कला अधिक चांगली करायची आहे. माझ्या पोस्टचा चुकीचा अर्थ लावला गेला आहे की मी अभिनय सोडत आहे किंवा मला माझ्या कुटुंबावर आणि आरोग्यावर लक्ष केंद्रित करायचे आहे," असं विक्रांत आपल्या पोस्टमध्ये म्हणाला. त्याच्या आधीच्या पोस्टमध्ये, विक्रांतनं त्याचे चाहते आणि फॉलोअर्स यांच्याकडून मिळालेल्या प्रमाबद्दल आभार मानले होते.
विशेष म्हणजे अभिनयातून ब्रेक घेत असल्याचं जाहीर केल्यानंतर काही तासांनी, विक्रांतनं सोमवारी संध्याकाळी संसदेच्या बालयोगी सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या इतर खासदारांसह त्याच्या 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाच्या विशेष स्क्रीनिंगला हजेरी लावली होती. त्यानंतर विक्रांतनं आपला अनुभव प्रसारमाध्यमांशी शेअर करताना सांगितलं की, "मी हा चित्रपट पंतप्रधान, सर्व कॅबिनेट मंत्री आणि अनेक खासदारांबरोबर पाहिला. हा एक खास अनुभव होता. मी अजूनही तो शब्दात व्यक्त करू शकत नाही कारण मी मी खूप आनंदी आहे... माझ्या कारकिर्दीतील हा सर्वोच्च बिंदू आहे, की मला पंतप्रधानांसह माझा चित्रपट पाहायला मिळाला."