छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : “मराठी भाषेचा जन्म मराठवाड्यात झाला. पण भाषेचे विद्यापीठ विदर्भात गेलं. याला मराठवाड्यातील मंत्र्यांची अनास्था आणि खुर्चीला चिटकून बसण्याचा स्वभाव जबाबदार आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी दिली. मराठी भाषेच्या अभिजात दर्जा संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. त्याचवेळी अभिजात दर्जा मिळाला होता. आता केलेल्या घोषणेमुळं आणि मिळणाऱ्या निधीमुळं लेखक आणि नेते भारावून गेलेत. पण सरकारनं भाषा विकासासाठी ठोस तरतूद केली नाही, असा आरोपही त्यांनी केला.
साहित्य संमेलनाचे उद्घाटन : ४४ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या शनिवारी उद्घाटन पार पडले. व्यासपीठावर उपस्थित असलेल्या जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यासह अनुपस्थित असलेल्या भाषा मंत्री उदय सामंत आणि मंत्री अतुल सावे यांच्यावर कौतिकराव ठाले पाटील यांनी टीकेची तोफ डागली. “कोकणात मत्स्यविद्यापीठ असायला हवे, पण ते नागपुरात गेले. तसाच प्रकार मराठी विद्यापीठाच्या बाबतीत झाला. विदर्भातील नेत्यांकडं सत्ता आहे. त्यामुळं त्यांनी विद्यापीठ खेचून नेलं. पण मराठवाड्यातील मंत्री मात्र गप्प बसले,” असा टोला त्यांनी संजय शिरसाट यांच्या उपस्थितीत लगावला. तर तमिळनाडू सरकारनं त्यांच्या भाषेच्या संवर्धनासाठी ठोस धोरण आखलंय. पण आपलं सरकार काय करणार?, असा सवाल करत त्यांनी सरकारच्या भाषा विषयक धोरणावरही नाराजी व्यक्त केली.
मंचावरून टोलेबाजी : साहित्य संमेलन उद्घाटनाला मराठी भाषामंत्री उदय सामंत यांनी दांडी मारली. त्यावर वेळ देताना त्यांनी ती पाळली पाहिजे, याबाबत मी पत्र लिहून माझं म्हणणं मांडणार आहे, असं ठाले पाटील म्हणाले. तर पालकमंत्री संजय शिरसाट उद्घाटन कार्यक्रमास दीड तास उशिरा पोहोचले. त्यावेळी त्यांचे स्वागत तुतारी वाजवून करण्यात आले. मात्र, ठाले पाटील यांनी हा प्रकार थांबवण्याचं आवाहन केलं. त्यांनी भाषणातही मंत्री शिरसाटांवर टीका केली. यावर प्रत्युत्तर देताना मंत्री शिरसाट म्हणाले, “साहित्य संमेलनात वाद हा प्रघात झाला आहे. साहित्यिक समाज घडवतात. पण, त्यांचे महत्त्व अनेकांना समजत नाही. साहित्य संमेलन आम्ही इव्हेंट म्हणून पाहतो. कारण राजकारणातील माणसं याला वेगळी शाखा समजतात,” असं सांगत त्यांनी आपलं मत व्यक्त केलं. उशिरा येण्याबाबत आयोजकांना आधीच कळवलं होतं, असं स्पष्ट करत शिरसाट यांनी या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा -