पुणे : महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीनं आणि पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या मूळ संकल्पनेतून साकारत असलेली 'शिवसृष्टी' पाहून मी नि:शब्द झालो. ही शिवसृष्टी पुढील पिढ्यांसाठी प्रेरणेचं एक केंद्र ठरणार आहे. यातील पुढील टप्पे लवकरात लवकर पूर्ण व्हावे या दृष्टीने शिवसृष्टीच्या तिसऱ्या टप्प्याच्या उभारणीसाठी आम्ही राज्य सरकारतर्फे ५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार आहोत. अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
शिवसृष्टीच्या द्वितीय चरणाचे लोकार्पण : आज शिवजयंतीचं औचित्य साधत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीनं आंबेगाव बुद्रुक येथे उभारण्यात येत असलेल्या शिवसृष्टीच्या द्वितीय टप्प्याचं लोकार्पण करण्यात आलं. खासदार उदयनराजे भोसले, केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकात पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा : यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "मी आणि राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री आम्ही तिघेही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळेच आहोत. त्यामुळं ही शिवसृष्टी पूर्ण व्हावी ही आम्हा सर्वांची इच्छा आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. ही आपल्यासाठी आनंदाची बाब आहे. भाषेचं महत्त्व छत्रपती शिवाजी महाराजांनी जाणलं होतं आणि म्हणूनच त्यांनी स्वराज्यात मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा देऊ केला होता. त्याकाळी अरबी, फारसी भाषेत चालणारा राज्यकारभार महाराजांनी मराठीमध्ये चालू केला होता. त्याकाळी महाराजांनी आज्ञापत्रे, राजकारभारातील अनेक शब्द देखील मराठीमध्ये आणले".
शिवसृष्टीला भेट द्यायलाच हवी : शिवसृष्टीला राज्य सरकारने महत्त्वाच्या पर्यटन स्थळाचा दर्जा दिला असला तरी, शिवसृष्टी हे निव्वळ एक पर्यटन केंद्र नसून छत्रपती शिवरायांवरील अभ्यासाचे आणि त्यांच्या व्यक्तीमत्त्वापासून प्रेरणा घेण्याचे केंद्र आहे. मी देश-विदेशात अनेक अॅम्युझमेंट प्रकल्पांना भेट दिली आहेत. मात्र, शिवसृष्टीमध्ये जो विचार जी प्रेरणा मिळाली ती शब्दांत वर्णन करता येणार नाही असं सांगत देवेंद्र फडणवीस म्हणाले, “या प्रकल्पाला भेट दिली नाही तर तुम्ही स्वर्गीय आनंदाला मुकाला असं मला वाटतं. देशातील आणि राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्यानं शिवसृष्टीला भेट द्यायलाच हवी.” आज साकारत असलेली ही शिवसृष्टी पाहून पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे हे देखील स्वर्गातून शुभाशीर्वाद देत असतील". ही शिवसृष्टी हे राष्ट्रकार्य आहे, हीच भावना आमच्या मनात असल्याचेही यावेळी फडणवीस म्हणाले.
पाणी गंगासागरात अर्पण : शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्यात उभारण्यात आलेल्या गंगासागर तलावात रायगड, राजगड, प्रतापगड, सिंहगड या किल्ल्यावरून आणलेलं पाणी आज मान्यवरांच्या हस्ते अर्पण करण्यात आलं. याशिवाय उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रयागराज येथून पाठविलेल्या पाण्याचा कलश, तुळापूर त्रिवेणी संगमांवरील पाणी आणि नर्मदा नदीचे पाणी देखील यावेळी गंगासागरता अर्पण करण्यात आले.
हेही वाचा -
- पुण्यात अवतरली शिवशाही : शिवछत्रपतींना सरदारांच्या वंशजांकडून भव्यदिव्य मानवंदना, हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी
- छत्रपती शिवाजी महाराज जयंती 2025 : अद्भुत स्थापत्य, अभेद्य राज्य; छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीपुढं शत्रू हतबल
- छत्रपती शिवाजी महाराजांनी पराक्रमानं आणि दूरदर्शी नेतृत्वानं स्वराज्याची पायाभरणी केली-पंतप्रधान मोदी