मुंबई : मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी दावोस दौऱ्यात 'ऑपरेशन टायगर'ची घोषणा केली होती. शिवसेनेत एकामागून एक प्रवेश होत जुने सहकारी आपल्यासोबत येतील, असा दावा त्यांनी केला होता. त्यानंतर काही दिवसांतच रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर-लांजा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांनी शिवसेनेत प्रवेश करत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला. त्यामुळं शिवसेनेच्या 'ऑपरेशन टायगर'ची महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू आहे. यावरुनच आता शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी महायुतीवर जोरदार टीका केलीय.
नेमकं काय म्हणाले संजय राऊत? : माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले, "कसलं ऑपरेशन टायगर? आज त्यांच्याकडं सत्ता आहे. त्यामुळे त्यांना सत्तेची मस्ती चढलीय. आम्हीही सत्ता भोगलेली आहे. परंतु, सत्तेचा माज आणि अशी विकृती केलेली नाही. सत्ता आणि यंत्रणा असल्यामुळं ते दुसऱ्यांवर दबाव टाकत आहेत. परंतु, फक्त दोन तास ईडी आमच्या ताब्यात द्या. मग अमित शाहसुद्धा आमच्या पक्षात येतील की नाही ते बघा. दोन तास ही सर्व यंत्रणा आमच्या हातात असेल तर हे सर्व नेते बावनकुळेंपासून ते सगळे मातोश्रीवर येऊन आमच्या पक्षात प्रवेश करतील," अशी टीका संजय राऊत यांनी केली.
दिल्लीतील चेंगराचेंगरी 100 ते 130 जणांचा मृत्यू : नवी दिल्लीमधील रेल्वे स्टेशनवरील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवरून त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. "प्रयागराजमध्ये अनेक लोकांचा चिरडून मृत्यू झाला. तिथं 7000 च्या वर लोकं गायब आहेत. ही घटना ताजी असतानाच आता दिल्लीतील रेल्वे स्टेशनवरील चेंगराचेंगरीत अनेकांचे मृत्यू झालेत. सरकार सांगतंय 18 लोक गेलेत. परंतु, माझ्या माहितीप्रमाणे 100 ते 130 लोकांचा मृत्यू झालाय," असा दावा संजय राऊत यांनी केलाय.
आम्हाला बोलायला तोंड नाहीत का? : "जर मी तोंड उघडलं तर उद्धव ठाकरेंना देश सोडून पळून जावं लागेल," असं वक्तव्य रामदास कदम यांनी केलं होतं. यासंदर्भात राऊत यांना विचारण्यात आलं असता ते म्हणाले, "अरे बापरे! जर ते असं बोललेत, तर आम्हाला बोलायला तोंड नाही का? सर्वांना तोंड आहे. परंतु, पक्षानं नाव आणि सर्व पद देऊन त्यांच्याविषयी असं बोलत असाल तर ते हे राजकारणातील नैतिकतेला धरून नाही. तुम्ही पराभूत झाल्यानंतरसुद्धा उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेवर तुम्हाला पाठवलं होतं. याची जर जाण नसेल, कृतज्ञता नसेल तर त्यांच्याकडं माणुसकी नाही."
भास्कर जाधव हे नाराज आहेत का? : शिवसेनेला (उबाठा) गळती लागली असून भास्कर जाधव हे नाराज असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत. कालच्या (शनिवारी) बैठकीलादेखील ते उपस्थित नव्हते. यावर बोलताना राऊत म्हणाले, "त्यांना उशिरा आमंत्रण गेलं. त्यांच्या कुटुंबातील एकाचं लग्नदेखील होतं. त्यामुळं ते येऊ शकले नाहीत. परंतु, ऑनलाईन पद्धतीनं ते बैठकीला उपस्थित होते. भास्कर जाधव हे कोकणातील शिवसेनेचे (उबाठा) ज्येष्ठ नेते आहेत. आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत. मी त्यांच्याशी सतत चर्चा केलीय. त्यांनी मांडलेल्या भूमिकेवर पक्षामध्ये चर्चा सुरू आहे. परंतु, ते नाराज नाहीत."
हेही वाचा -