मुंबई Maherchi Sadi Completed 33 Years : खच्चून भरलेलं चित्रपटगृह. . .त्यात हमसून हमसून रडणाऱ्या महिला अन् हुंदके देणाऱ्या मुली, चित्रपटगृहाबाहेर जाऊन आसवांनी भिजलेला रुमाल पिळून पुन्हा भावनेला वाट मोकळी करुन देणारी माणसं. अतिशयोक्ती वाटावा असा प्रसंग! विशेष म्हणजे हे चित्र मुंबईतल्या मराठी चित्रपटांच्या हक्काच्या 'भारतमाता' चित्रपटगृहासह उर्वरित महाराष्ट्रातल्या अनेक चित्रपटांनी पाहिलं. चित्रपटाने तुफान व्यावसायिक मिळवणं नवीन नाही. मात्र बॉक्स ऑफिस यशाबरोबरच चित्रपटरसिकांच्या मनाचा ठाव घेणं, ही बाब दुर्मिळ! काही चित्रपट इतिहास घडवण्याचं प्राक्तन घेऊन रसिकांसमोर येतात. त्यातही एखादाच दंतकथा बनतो. 'माहेरची साडी' म्हणजे अशीच एक दंतकथा. चित्रपट झळकला आणि मराठी चित्रपटविश्वाला नवी 'ट्रॅजेडी क्वीन' मिळाली. होय मराठीतली नवी ट्रॅजेडी क्वीनच, जिनं महाराष्ट्रातील घराघरात, मनामनात आपल्या अभिनयाचं गारुड केलं, जिनं महिलांसह पुरुषांनाही चित्रपटगृहात हमसून हमसून रडायला लावलं. ते नाव म्हणजे अलका कुबल (आठल्ये). आज 'माहेरची साडी' या चित्रपटाला 33 वर्ष पूर्ण झाली, मात्र आजही हा चित्रपट लागला, तर कलाप्रिय मराठी माणूस हुंदके आवरत नकळत आपल्या डोळ्यातून येणाऱ्या आसवांना वाट मोकळी करुन देतो. महिलांना अश्रूंचा आवेग आवरत नाही. त्या पदर डोळ्याला लाऊन हमसून हमसून रडतात. मराठी चित्रपट सृष्टीत 'दंतकथा' ठरलेल्या 'माहेरची साडी' या चित्रपटानं आज 33 वर्ष पूर्ण केली, त्यानिमित्तानं ही विशेष माहिती.
मराठी चित्रपट सृष्टीला मिळाली नवी 'ट्रॅजेडी क्वीन' :मराठी चित्रपटसृष्टीत अलका कुबल यांच्या 'माहेरची साडी' या चित्रपटानं सगळे रेकॉर्ड ब्रेक केले. अलका कुबल यांच्या रुपानं मराठी चित्रपटसृष्टीला नवी 'ट्रॅजेडी क्वीन' मिळाली. या चित्रपटानं अलका कुबल (आठल्ये) यांना घराघरात पोहोचवलं. त्या मराठी चित्रपटरसिकांच्या अलकाताई झाल्या. या चित्रपटाच्या आधीही अलकाताईंनी काही चित्रपटांमध्ये काम केलं होतं. वयाच्या 15 व्या वर्षी त्या दिवंगत स्मिता पाटील यांच्या जबरदस्त अभिनयानं नटलेल्या 'चक्र' चित्रपटातून कॅमेऱ्याला सामोऱ्या गेल्या. नंतरही काही मराठी चित्रपटांमधून महत्त्वाच्या व्यक्तिरेखा साकारल्या. मात्र 'माहेरची साडी'नं चित्रपटसृष्टीचं सर्व गणितच बदललं. अलकाताई जणू सर्व मराठी कलाप्रेमींच्या घरच्या सदस्य झाल्या. आजही 'माहेरची साडी' हा चित्रपट पाहणारा प्रेक्षक मुश्किलीने हुंदका आवरतो. महाराष्ट्रातील असं क्वचितच एखादं घर असेल, जिथल्या सदस्याने त्या काळात हा चित्रपट पाहिला नाही. महिलांच्या मनावर आजही या चित्रपटाचं गारुड कायम आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत दिवंगत मीना कुमारी यांना 'ट्रॅजेडी क्वीन' म्हणून ओळखलं जातं. हेच बिरुद मराठीत अलकाताईंनी मिळवलं.
अलकाताईंचं स्मरणरंजन :'माहेरची साडी' प्रदर्शित झाल्याच्या घटनेला 33 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल ईटीव्ही भारतने अलका कुबल- आठल्ये यांच्याशी संवाद साधला. ईटीव्ही भारतशी एक्स्लुसिव्ह बोलताना 'माहेरची साडी' च्या आठवणींना अलकाताईंनी उजाळा दिला.
"निर्माता विजय कोंडके यांना या चित्रपटात काम करण्यासाठी भाग्यश्री पटवर्धन ही अभिनेत्री हवी होती. मात्र विजय चव्हाण, पितांबर काळे आणि उमेश वैद्य यांनी या भूमिकेसाठी माझ्या नावाचा आग्रह धरला. त्यामुळे या 'ऑल टाइम ग्रेट' चित्रपटासाठी मला जे योगदान देता आलं त्याचं मोठं श्रेय या तिघांना जातं. खरंतर सुरुवातीला हा चित्रपट फारसा चालला नाही. मात्र तिसऱ्या, चौथ्या आठवड्यानंतर चित्रपटानं मोठी भरारी घेतली. 'माहेरची साडी' ने आम्हाला स्वप्नवत यश मिळवून दिलं. आजही 'माहेरची साडी' म्हणजे अलका कुबल हे समीकरण घट्ट आहे. या चित्रपटातले माझे काही सहकारी आमची साथ सोडून अनंताच्या प्रवासाला निघून गेले, याचं मात्र खूप वाईट वाटतं."
चित्रपटाच्या रम्य आठवणी जागवताना यातल्या विजय चव्हाण, विक्रम गोखले, रमेश भाटकर, सुहासिनी देशपांडे आदी सहकाऱ्यांबरोबरचा स्नेहभावाची आठवून अलकाताईंचा आवाज कातर झाला.