मुंबई - Mahatma gandhi death anniversary :राष्ट्रपिता आणि महात्मा गांधी यांची आज 30 जानेवारी रोजी 76 वी पुण्यतिथी आहे. 30 जानेवारी 1948 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची दिल्लीतील बिर्ला हाऊसमध्ये प्रार्थना सभेसाठी जात असताना नथुराम गोडसेने त्यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. गांधीजींनी शेवटच्या श्वासापूर्वी 'हे राम'चा जप केला होता. सत्य व अहिंसा हाच माझा धर्म मानणाऱ्या गांधींजींची पुण्यतिथी असल्यानं अनेकजण सोशल मीडियावर त्यांना आंदरांजली वाहताना दिसत आहेत. देशासाठी बलिदान देणाऱ्या महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आम्ही त्यांच्यावर बनवलेल्या चित्रपटांची चर्चा करणार आहोत.
गांधी : सर रिचर्ड ॲटनबरो दिग्दर्शित हा चित्रपट असून बेन किंग्सले यांनी महात्मा गांधींची भूमिका साकारली होती. 'गांधी' हा चित्रपट 1982मध्ये प्रदर्शित झाला होता. अहिंसा आणि सविनय कायदेभंगाच्या विचारसरणीतून ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीतून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी दिलेला लढा या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. या चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
गांधी माय फादर : राष्ट्रपिता यांच्या जीवनाचा एक भाग ज्याकडे सर्वसाधारणपणे दुर्लक्ष केले जाते. गांधीजींचा मुलगा हरिलाल गांधी यांच्यावर आधारित आहे. या चित्रपटात अभिनेता अक्षय खन्नानं मुख्य भूमिकेत काम केलं आहे. फिरोज अब्बास खान यांनी गांधी 'माय फादर'चं दिग्दर्शन केलं असून अनिल कपूर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
हे राम : हा चित्रपट भारताची फाळणी आणि महात्मा गांधी यांची नथुराम गोडसेने केलेली हत्या यावर आधारित आहे. चित्रपटात अष्टपैलू अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी गांधीजींची भूमिका साकारली आहे. याशिवाय कमल हसन हे हिंदू कट्टरतावादी साकेत रामच्या भूमिकेत आहे. कमल हसन यांनी 'हे राम' या ऐतिहासिक नाटकाचे लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती केली आहे. या चित्रपटात शाहरुख खान आणि राणी मुखर्जी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.