मुंबई Lata Mangeshkar Death Anniversary : 'गानसम्राज्ञी' लता मंगेशकर जरी आज आपल्यात नसल्या, तरी त्यांचं संगीत क्षेत्रातील योगदान शतकानुशतकं स्मरणात राहील. त्यांनी आपल्या कारकिर्दीत असा टप्पा गाठला आहे, ज्याची पुनरावृत्ती करणं कोणत्याही कलाकारासाठी जवळपास अशक्यच! लता मंगेशकर यांनी 36 भाषांमध्ये सुमारे 50 हजाराहून अधिक गाण्यांना आवाज दिला आहे. आज (6 फेब्रुवारी) त्यांची दुसरी पुण्यतिथी. 2022 मध्ये त्यांनी आजच्याच दिवशी वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
बालपणीच वडिलांचं निधन झालं : लता मंगेशकर यांचा जन्म 28 सप्टेंबर 1929 रोजी मध्य प्रदेशातील इंदूर येथे झाला. त्यांचंं बालपण संघर्षमय होतं. त्या 13 वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. लताजींच्या वडिलांचे मित्र मास्टर विनायक यांनी त्यांना गायनाच्या दुनियेत आणलं. पाच भावंडांमध्ये त्या सर्वात मोठ्या होत्या. आपल्या भावा-बहिणींच्या शिक्षणासाठी त्या स्वतः अभ्यासापासून दूर राहिल्या.
गुलाम हैदर यांनी पहिला ब्रेक दिला : आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यात लताजींनी मराठी संगीत नाटकांमध्ये काम केलं. त्यांनी वयाच्या 14व्या वर्षापासून विविध कार्यक्रमांमध्येही भाग घेण्यास सुरुवात केली. यानंतर त्या चित्रपटांमध्ये गाणी गायला लागल्या. संगीतकार गुलाम हैदर यांनी लतादीदींना पहिला ब्रेक दिला. मात्र, फाळणीनंतर ते लाहोरला गेले. 'मजबूर' या 1948 सालच्या चित्रपटातील 'दिल मेरा तोडा' या गाण्यासाठी त्यांनी लतादीदींना आवाज देण्याची ऑफर दिली होती. त्यावेळी हे गाणे खूप गाजलं आणि त्यानंतर लतादीदींनी कधीच मागे वळून पाहिलं नाही.