मुंबई - Krystyna Pyszkova Miss World 2024 :71व्या मिस वर्ल्डचा ग्रँड फिनाले 9 मार्च रोजी जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, मुंबई येथे झाला आहे. तब्बल 28 वर्षांनंतर भारतात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. चित्रपट निर्माता करण जोहर आणि माजी मिस वर्ल्ड 2013 मेगन यंग (फिलिपिन्स) यांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं. चेक गणराज्यच्या क्रिस्टिना पिस्कोव्हानं 71व्या मिस वर्ल्ड स्पर्धेचे विजेतेपद पटकावलं आहे. विजेतेपद पटकावल्यानंतर क्रिस्टीनानं कृतज्ञता व्यक्त केली.
क्रिस्टिना पिस्कोव्हानं जिंकला ताज : मिस वर्ल्ड 2024 म्हटलं, ''मी माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी येथे उभी आहे. मी खूप उत्सुक आहे. मिस वर्ल्ड अशी एक गोष्ट होती, ज्यावर मी बऱ्याच दिवसांपासून काम करत होते. मला माहित आहे की, मिस वर्ल्ड प्लॅटफॉर्ममुळे मी त्याबद्दलची जागरूकता आणू शकेन. मी जास्तीत जास्त मुलांना मदत करू, शकेन यांची मला खात्री आहे.'' दरम्यान पोलंडच्या मिस वर्ल्ड 2022 कॅरोलिना बिएलॉस्काच्या हस्ते क्रिस्टिना पिस्कोव्हाला विजेतपदाचा मुकुट घातला. या कार्यक्रमात रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता मुकेश अंबानींपासून बिग बॉस 17 चे विजेते मुनावर फारुकी आणि चित्रपट निर्माते साजिद नाडियादवाला यांच्यासह अनेक नामांकित व्यक्तींनी हजेरी लावली होती.
मिस वर्ल्ड 2024 स्पर्धा : मिस वर्ल्ड क्रिस्टीनानं 110 हून अधिक देशांतील स्पर्धकांना पराभूत केले. स्पर्धेत लेबनॉनच्या यास्मिना झायटौनला प्रथम उपविजेतेपद मिळाले. क्रिस्टीनानं टांझानियामध्ये गरजू मुलांसाठी शाळा उघडली आहे. याशिवाय ती स्वयंसेवक देखील आहे. क्रिस्टीनाला बासरी आणि व्हायोलिन वाजवायला आवडते. तिला संगीत कलेची खूप आवड आहे. मिस वर्ल्ड 2024च्या स्पर्धेत अंतिम फेरीसाठी 12 ज्यूरीच्या पॅनेलमध्ये चित्रपट निर्माते साजिद नाडियादवाला, अभिनेत्री क्रिती सेनॉन, पूजा हेगडे, माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग, सामाजिक कार्यकर्त्या अमृता फडणवीस होते. याशिवाय या कार्यक्रमात मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनच्या चेअरपर्सन आणि सीईओ ज्युलिया मोर्ले, स्ट्रॅटेजिक पार्टनर आणि होस्ट मिस वर्ल्ड इंडिया जमील सईदी हे नामंकित व्यक्ती उपस्थित होते. या कार्यक्रमात नेहा कक्कर, टोनी कक्कर आणि शान यांनी जबरदस्त परफॉर्मन्स दिला. आता सोशल मीडियावर या कार्यक्रमामधील काही व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहे. हे व्हिडिओ आणि फोटो अनेकांना आवडत आहेत. याशिवाय काहीजण क्रिस्टीनाला हा किताब जिंकल्याबद्दल शुभेच्छा देत आहेत.
हेही वाचा :
- मैदानचा ट्रेलर रिलीज : अजय देवगणने 'मैदान'मधून फुटबॉलचा सुवर्णकाळ परत आणला
- एल्विश यादवनं यूट्यूबर सागर ठाकूरला मारहाण केल्यानंतर केला जारी व्हिडिओ
- हीरामंडीचे सकल बन गाणे : अमीर खुसरोंच्या कवितेला भन्साळींच्या संगीतानं दिले पुनर्जिवन