मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार आमिर खानचा मुलगा जुनैद खान त्याचा आगामी चित्रपट 'लवयापा'च्या रिलीजसाठी सज्ज झाला आहे. रिलीजपूर्वी, निर्मात्यांनी जुनैद खान आणि खुशी कपूर स्टारर चित्रपटाचा टायटल ट्रॅक आज, 3 जानेवारी रोजी रिलीज केला आहे. सोशल मीडियाच्या काळातील जुनैद आणि खुशी यांच्यातील मजेशीर केमिस्ट्री या गाण्यात दाखवण्यात आली आहे. नक्श अजीज आणि मधुबंती मधुबंती बागची यांनी या गाण्याला आवाज दिला आहे. झी म्युझिक कंपनीनं इंस्टाग्रामवर या गाण्याची झलक शेअर केली आहे. यावर त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'बाबू शोना करता करता डोक्याचा झाला भजियापा? 'लवयापा'ची सुरुवात आहे. 'लवयापा हो गया' हे गाणं रिलीज झालं आहे. 7 फेब्रुवारी 2025 पासून या व्हॅलेंटाईन आठवड्यात 'लवयापा' चित्रपटगृहात.'
'लवयापा'ची कहाणी : हा आगामी रोमँटिक कॉमेडी चित्रपट 7 फेब्रुवारी 2025 रोजी रुपेरी पडद्यावर दाखल होईल. 'लाल सिंग चड्ढा'चं दिग्दर्शन करणारा अद्वैत चंदननं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. फँटम स्टुडिओ आणि एजीएस एंटरटेनमेंट या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. निर्मात्यांच्या म्हणण्यानुसार, "लवयापा' ही प्रेमाची आणि गुंतागुंतीची कहाणी आहे. या चित्रपटामधील गुंतागुंतीमध्ये खूप मजा आणि विनोद आहेत, जे एक सिनेमॅटिक ट्रीट असणार आहे." आता मोठ्या पडद्यावर जुनैदला पाहण्यासाठी अनेकजण आतुर आहेत.