मुंबई - Elvish yadav : सोशल मीडियावरील प्रसिद्ध यूट्यूबर एल्विश यादवला नोएडा पोलिसांनी अटक केली आहे. सापाच्या विषाची कथित खरेदी आणि विक्री केल्याप्रकरणी त्याला अटक झाली आहे. चौकशीदरम्यान, राहुल नावाच्या आरोपीनं कबुली देत सांगितलं होत की, तो पार्टीत सहभागी असलेल्या आरोपींना यापूर्वीही रेव्ह पार्ट्यांमध्ये भेटला होता. एल्विशवर पार्ट्यांमध्ये सापाचे विष पुरवल्याचा आरोप आहेत. नोव्हेंबरमध्ये अटक करण्यात आलेल्या आरोपींशी संपर्कात असल्याची कबुली आता एल्विश यादवनं देखील दिली आहे. नोएडा पोलिसांनी 17 मार्चच्या संध्याकाळी एल्विशला अटक केली होती. काही महिन्यांपूर्वी, एल्विश एका रेव्ह पार्टीमध्ये दिसला होता, जिथे तो त्याच्या मित्रांबरोबर डान्स आणि पार्टी करत होता. या पार्टीमध्ये त्याच्या गळ्यात दुर्मिळ साप देखील होते.
दोषी असल्यास जामीन मिळणे कठीण : नोएडा पोलिसांनी एल्विश यादवविरुद्ध एनडीपीएस कायद्याच्या कलम 29 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या कायद्यांतर्गत ड्रग्जशी संबंधित कटात आणि ड्रग्जच्या खरेदी-विक्रीशी संबंधित प्रकरण असल्यास कारवाई केली जाते. कलम 29 अंतर्गत दोषी सापडल्यास जामीन मिळणे खूप कठीण होते. सध्या एल्विश यादवला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 3 नोव्हेंबर 2023 रोजी नोएडा सेक्टर 51 येथील बँक्वेट हॉलमध्ये एल्विशनं सापाचे विष दिले होते. एल्विश यादव आणि इतर सहा जणांविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायदा आणि आयपीसीच्या कलम 129 (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.