मुंबई - Bigg Boss OTT 3 Winner: 'बिग बॉस ओटीटी सीझन 3'च्या विजेत्याची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी सना मकबुलनं बाजी मारली आहे. अंतिम फेरीत तिनं रॅपर नेझीचा पराभव केला आहे. सनाच्या या यशामुळे तिचे चाहते खूप खुश आहेत, अनेकजण तिच्यावर सोशल मीडियाच्या माध्यामातून अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. ग्रँड फिनालेमध्ये सनाबरोबर रणवीर शौरी, कृतिका मलिक, रॅपर नेझी आणि साई केतन राव हे स्पर्धक होते. अंतिम फेरीत सनाच्या डोक्यावर 'बिग बॉस 3' मुकुट सजला. जवळपास 6 आठवड्यांनंतर, 'बिग बॉस ओटीटी सीझन 3'चा विजेता मिळाला आहे.
सना मकबुलनं मारली बाजी :अनिल कपूरच्या या रिॲलिटी शोमध्ये सना मकबुलनं विजयाचा झेंडा फडकावला आहे. या विजयासह सनानं इतिहास रचला आहे. 21 जूनपासून सुरू झालेल्या 'बिग बॉस ओटीटी सीझन 3'मध्ये 16 स्पर्धकांनी घरात प्रवेश केला होता. सना मकबूलनं तिच्या चमकदार खेळामुळे बिग बॉसच्या घरात आपलं स्थान मजबूत बनवलं होतं. 42 दिवसांच्या मेहनतीनंतर हा विजय मिळाल्यावर सना भावूक होताना दिसली. 'बिग बॉस ओटीटी 3'च्या पूर्वी सना 'खतरों के खिलाडी सीझन 11' आणि 'फियर फॅक्टर' सारख्या शोमध्ये स्पर्धक म्हणून दिसली होती. बिग बॉस जिंकल्यानंतर ती आपल्या करिअरमध्ये मोठी उंची गाठेल असं आता दिसत आहे.