मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची वांद्रे खेरनगर येथे गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच अभिनेता सलमान खान, अभिनेता संजय दत्त, अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि अभिनेता झहीर इक्बाल यांच्यासह अनेक बॉलिवूड कलाकारांनी शनिवारी रात्री उशिरा लीलावती रुग्णालयात बाबा सिद्दीकी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. या कठीण काळात कलाकारांनी शोकाकुल कुटुंबाप्रती शोक आणि सहवेदना व्यक्त केली.
रितेश देशमुखची एक्सवरील पोस्ट : अभिनेता रितेश देशमुख यानं या घटनेबद्दल दु:ख व्यक्त करत म्हटलंय की, "बाबा सिद्दीकी यांच्या निधनाबद्दल कळाल्यावर धक्का बसला. झिशान सिद्दीकी, सिद्दीकी कुटुंबीय आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. ईश्वर त्यांना या कठीण काळात धैर्यानं सामर्थ्य देवो. या भीषण गुन्ह्यातील गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे", असं रितेश देशमुख यानं आपल्या एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे.
बाबा सिद्दीकींची गोळ्या झाडून हत्या :बाबा सिद्दीकी हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते होते. तसंच ते आमदार झिशान सिद्दीकी यांचे पिता होते. आमदार झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेरच तीन अज्ञात हल्लेखोरांकडून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. यात त्यांना तीन गोळ्या लागल्या. एक गोळी छातीत लागली. तर त्यांच्या सहकाऱ्याच्या पायालादेखील एक गोळी लागली. जखमी अवस्थेत बाबा सिद्दीकी यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, सिद्दीकी यांच्या हत्येनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन दिलंय. तसंच दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे. एक आरोपी अद्याप फरार असल्याचंही त्यांनी सांगितलंय.
हेही वाचा -
- बाबा सिद्दीकींच्या हत्येचे राजस्थानसह उत्तर प्रदेश कनेक्शन; दोघांना अटक, तिसरा फरार
- वाय दर्जाची सुरक्षा असतानाही बाबा सिद्दिकींची हत्या; विरोधकांकडून प्रश्न उपस्थित, सत्ताधारी काय म्हणाले?
- अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांची गोळीबारात हत्या; तीन हल्लेखोरांनी घातल्या गोळ्या