मुंबई - Ashok saraf :अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे 14 जून रोजी शुक्रवारी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुंबईतील यशवंतराव नाट्यगृह येथे पार पडलेल्या पुरस्कर सोहळ्याला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे विश्वस्त आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विश्वस्त आणि उद्योग मंत्री उदय सामंत, ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर असे मान्यवर उपस्थित होते. दोघांनाही जीवनगौरव पुरस्कार शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
अशोक सराफ यांना मिळाला जीवनगौरव पुरस्कार : अशोक सराफ यांनी पुरस्कार घेतल्यानंतर मनोगत व्यक्त करताना त्यांचा अभिनयाचा प्रवास आणि काही गंमतीशीर किस्से सांगितले. "मी अनेक सिनेमात पोलिसांची भूमिका केली आहे. त्यामुळे पोलीस जमातीचं माझ्यावर खूप प्रेम आहे, असं पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे बघत त्यांनी म्हटल्यानंतर एकच हश्या पिकाला. यावेळी मला एकदा पोलिसांनी त्रास दिल्याचा प्रसंग आठवत आहे. मला मागील काही महिन्यात अनेक पुरस्कार मिळाले. आता हा चौथा जीवन गौरव पुरस्कार मिळत आहे. पण आजचा पुरस्कार विशेष आहे. कारण पुरस्कार कोणाकडून मिळतोय... कोणाच्या हातून मिळतोय हे फार महत्त्वाचं असतं. मी मागील अनेक वर्षापासून राजकीय क्षेत्रात शरद पवार साहेबांना पाहतोय. ते माझे अत्यंत आवडते नेते आहेत. कुठलीही अडचण असो आणि कोणतंही काम असो, पवार साहेब पटकन सोडवतात. सर्वांच्या मदतीला धावून येतात. माझं एक काम होतं, ते त्यांनी अवघ्या तीन मिनिटात केलं. महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण यांच्यापासून कलेची जाण असणारे राजकीय नेते आपल्याला लाभले आहेत. शरद पवार साहेबांना कलेची जाण आहे, असं म्हणत अशोक सराफ यांनी शरद पवार यांचं कौतुक केलं. मी अनेक सिनेमात आणि नाटकात काम केलंय. जे जे काम करत गेलो... ते ते काम लोकांना आवडत गेलं. रसिक प्रेक्षकांच्या प्रेमामुळे आणि पाठिंबामुळे मी इथपर्यंत पोहोचू शकलो. त्यामुळे हा खरा पुरस्कार रसिक प्रेक्षकांचा आहे." असं अशोक सराफ यांनी म्हटलं.
हातपाय चालेपर्यंत काम करणार :यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी मनोगत व्यक्त करताना आपल्या अभिनय प्रवासातील अनेक आठवणींना उजाळा दिला. "गांधी" चित्रपटात कस्तुरबा या भूमिकेमुळे मी जगभरात पोहोचले. आंतरराष्ट्रीय पातळीवर माझी दखल घेतली गेली. मला अनेक पुरस्कार मिळाले. मी अभिनय शिकण्यासाठी दिल्लीला गेले आणि त्या ठिकाणीही मला नोकरीची ऑफर होती. पण महाराष्ट्रात येऊन काम करण्याची माझी इच्छा होती. जे वाटायला आले ते प्रामाणिकपणे करत गेले. आज हा जीवनगौरव पुरस्कार स्वीकारत असताना खूप आनंद होत आहे. अजूनही पुढे काम करण्याची इच्छा आहे. मी इथेच थांबणार नाही, जोपर्यंत माझे हातपाय चालतात... तोपर्यंत मी अभिनय क्षेत्रात काम करत राहणार, असं अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी म्हटलं. मराठी नाट्यसृष्टी ही देशात मोठी आहे. मराठी साहित्यसंस्कृती महाराष्ट्राला लाभली आहे. जे मराठीतील नाटक आहेत त्यांचे संदर्भरूपात पुस्तक आलं पाहिजे."मुंबईत एक असे भव्य-दिव्य नाट्य संमेलन व्हावे ज्यामध्ये मराठीसह अन्य भाषेतील नाटकं व्हावीत, यातून नवोदितांना शिकता येईल, अशी इच्छा ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी बोलून दाखवली.
पुरस्कारासाठी योग्य व्यक्तींची निवड : या पुरस्कार सोहळ्यात अध्यक्ष म्हणून शरद पवार होते. अंतिम भाषणात शरद पवार यांनी बोलताना अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांच्या अभिनयाचं कौतुक केलं. "दोघांनीही अनेक सिनेमा, नाटकात उत्तम काम केलंय. मराठी प्रेक्षकांना अशोक सराफ यांनी खळखळून हसवलं आहे. मी त्यांचं "हमिदाबाईची कोठी" हे नाटक पाहिलं आहे. दोघांनाही पुरस्कार मिळाल्यामुळे मी त्यांचं अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो. शासनाकडून अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेसाठी आगामी काळात कोणती मदत लागली तर मला नक्की आवाज द्या. माझा उपयोग होत असेल तर मला आनंद होईल, असं शरद पवार यांनी म्हटलं. राज्य शासनानं यशवंतराव नाट्यगृहाच्या नूतनीकरणासाठी जी आर्थिक मदत केलेली आहे त्याचा योग्य उपयोग नाट्य परिषदेनं केला." उद्योग मंत्री उदय सामंत यावेळी बोलताना म्हटलं की, "शासनानं यशवंत नाट्यगृहाच्या नूतनीकरणासाठी दहा कोटी रुपयेचा निधी दिला आहे. त्याचा योग्य वापर आणि पारदर्शी व्यवहार नाट्य परिषदेकडून होत आहे. आगामी काळात कोणतीही मदत लागली तरी शासनाचा प्रतिनिधी म्हणून आम्ही तयार आहोत. तसेच फक्त शहरी भागात कलाकार तयार होता कामा नये तर, गाव-खेड्यातूनही कलाकार पुढे आले पाहिजेत. बॅक स्टेजचे कलाकार, टेक्निकल आर्टिस्ट, छोटे कलाकार त्यांच्यासाठी आगामी काळात मुंबईत स्वतःच घर असायला पाहिजे. यासाठी काहीतरी करण्याची इच्छा आहे, परंतु यासाठी नाट्य परिषद आणि मराठी कलाकार यांनीही पाठिंबा आणि सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे." असं उदय सामंत यांनी सांगितलं.
हेही वाचा :
- 'चंदू चॅम्पियन' आणि 'मुंज्या' चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन, जाणून घ्या... - chandu champion Movie and Munjya
- अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' शी होणारी लढत टाळण्यासाठी 'सिंघम अगेन' चित्रपटाची रिलीज तारीख बदलली - Allu Arjun Pushpa 2
- शिवानी सुर्वे आणि समीर परांजपे म्हणताहेत 'थोडं तुझं आणि थोडं माझं'! - Thod Tujm Aag Thod Mazan