डॉग मॅन गुलशन भाटिया यांची जागतिक भटके प्राणी दिवस विशेष मुलाखत जयपूर World Stray Animals Day : धकाधकीच्या जीवनात कोणाकडंही वेळ नसल्यानं नातेसंबंध तुटत चालले आहेत. मात्र समाजात अशी काही माणसं आहेत जे प्राण्यांच्या वेदना जाणतात. त्यांची सेवा करतात. त्यांच्यावर आपल्या चिमुकल्यासारखं प्रेम करतात. आज श्वान पाळणं हा अनेकांचा शौक आहे. श्वान हा एक निष्ठावान प्राणी आहे. मात्र काही श्वानांना भटकं आयुष्य जगण्याची वेळ येते. त्यांना अनेक समस्यांना सामारं जावं लागते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका व्यक्तीची ओळख करुन देणार आहोत, ज्यानं रस्त्यावरच्या हजारो श्वानांना नवीन जीवन देऊन त्यांचा सांभाळ केला.
कोण आहेत ‘डॉग मॅन’ गुलशन भाटिया :आज जागतिक भटके प्राणी दिन ( World Stray Animals Day ) आहे. 'भाटिया पनीर टिक्का'साठी प्रसिद्ध असलेल्या गुलशन भाटिया यांची जयपूरमध्ये वेगळी ओळख आहे. आज आम्ही तुम्हाला गुलशन भाटिया यांच्या प्रसिद्ध पनीर टिक्काबद्दल नाही, तर त्यांच्या हृदयात वसलेल्या प्राण्यांबद्दलच्या प्रेमाबद्दल त्यांची ओळख करुन देणार आहोत. गुलशन भाटिया यांनी अनेक वर्षांपासून भटक्या श्वानांना नवीन जीवन दिलं आहे. ते दररोज 500 पेक्षा अधिक भटक्या श्वानांना खायला घालतात. एवढेच नाही तर शहरात कुठंही रस्त्यावरील श्वान जखमी झाल्याची माहिती मिळाल्यास तातडीनं त्याच्या मदतीसाठी पोहोचतात. गुलशन भाटिया यांच्या या सेवेमुळे लोक त्यांना ‘डॉग मॅन’ म्हणून ओळखतात.
काय आहे जागतिक भटके प्राणी दिवसाचा उद्देश :जगभरात ४ एप्रिल हा दिवस World Stray Animals Day म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी लाखो भटक्या प्राण्यांबद्दल जागरुकता निर्माण करण्यात येते. भटक्या प्राण्यांसाठी मदत करण्यासाठी विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येते. राजस्थानात देखील भटक्या प्राण्यांची संख्या खूप जास्त आहे. श्वानांबाबत समाजाचा समज चांगला नाही. त्यामुळे World Stray Animals Day हा दिवस आपल्याला व्यक्तीप्रमाणेच भटक्या प्राण्यांनाही त्यांचं जीवन जगण्याचा अधिकार आहे, अशी आठवण करुन देतो. भटक्या श्वानांवर हल्ले होताना आपण नेहमी पाहतो. अलीकडंच बिकानेरमध्ये 6 श्वानांच्या पिल्लांना जीवंत जाळण्यात आलं. त्यामुळे प्रत्येक माणसाच्या मनात त्यांच्याबद्दल दया आणि करुणेची भावना असायला हवी, असं हा दिवस आपल्याला आठवण करुन देतो.
500 श्वानांच्या खाण्याची व्यवस्था : डॉग मॅन गुलशन भाटीया सांगतात की, गेल्या वीस वर्षांपासून ते दररोज 500 पेक्षा अधिक श्वानांच्या खाण्याची व्यवस्था करतात. या श्वानांसाठी दररोज 50 लिटर दूध वेगळं घेतात. त्यासोबतच या रस्त्यावरील कुत्र्यांसाठी दुकानात बनवलेला पनीरचा खुराकही ते या श्वानांना देतात. उन्हाळ्यात श्वानांना उकाड्याचा त्रास होऊ नये, म्हणून त्यांनी अनेक ठिकाणी व्यवस्था केली आहे. "श्वानांची सेवा करण्याची प्रेरणा मला वडिलांकडून मिळाली," असं भाटिया यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितलं. "श्वानांच्या सेवेमुळे आयुष्यात चांगलं घडत आहे. या सगळ्यातून मनाला समाधान मिळते," असही त्यांनी यावेळी सांगितलं. रस्त्यावरील श्वानांची सेवा निवडण्यामागील कारण गुलशन भाटिया यांनी सांगितलं. ते म्हणाले की, "प्रत्येकजण गायींची सेवा करतो, परंतु प्रत्येकजण श्वानांची सेवा करत नाही. यामुळे श्वान भुकेले आणि तहानलेले राहतात. हे पाहून मी श्वानांच्या सेवेचा मार्ग निवडला. या कामात मला कुटुंबीय आणि समाजाकडून पूर्ण सहकार्य मिळत असल्याचा आनंद आहे."
हेही वाचा :
- शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत; दररोज १०० ठाणेकरांना कुत्र्यांचा चावा
- 'ऐकावं ते नवलच'! 30 श्वानांच्या उपस्थितीत 'हँडसम'चा वाढदिवस साजरा
- भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात पाच महिन्याच्या बाळाचा मृत्यू; झोपेत असताना केला हल्ला