कोलकाता : पश्चिम बंगालच्या हावडा जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, येथील एका महिलेनं आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी पैसे जमवण्याच्या बहाण्यानं तिच्या पतीला किडनी विकण्यास भाग पाडले. पतीनं 10 लाख रुपयांना किडनी विकली. त्यानंतर ही महिला सर्व पैसे घेऊन प्रियकरासह पळून गेली. पीडित पतीच्या कुटुंबीयांंनी केलेल्या तक्रारीच्या आधारे या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आल्याची माहिती एका पोलीस अधिकाऱ्यानं दिलीय.
कुटुंबानं तक्रारीत नेमकं काय म्हटलंय? : पीडित व्यक्तीच्या कुटुंबीयांनी तक्रारीत म्हटलंय की, सदरील महिलेनं पतीवर गेल्या एक वर्षापासून किडनी विकण्यासाठी दबाव टाकला होता. आपल्या 12 वर्षांच्या मुलीला चांगल्या शाळेत प्रवेश मिळावा, यासाठी पैशांची गरज असल्याचं ती सतत म्हणत होती. पत्नीवर विश्वास ठेवून पतीनं किडनी दान करण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यास होकार दिला. त्यानंतर महिलेनं किडनी खरेदीदारासोबत 10 लाख रुपयांचा सौदा केला. गेल्या महिन्यात पीडित व्यक्तीवर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, त्याच्या दिवसांनंतर महिला पैसे घेऊन घरातून निघून गेली.
पैसे घेऊन महिला फरार : पीडित पतीनं सांगितलं की, "एक दिवस ती घरातून निघून गेली आणि परत आलीच नाही. नंतर माझ्या लक्षात आलं की, कपाटातून 10 लाख रुपये रोख आणि इतर काही देखील गोष्टी गायब आहेत." त्यानंतर पीडित व्यक्तीच्या कुटुंबीयांनी ओळखीच्या लोकांच्या मदतीनं महिलेला शोधून काढलं. ती कोलकाताच्या उत्तरेकडील उपनगरातील बैरकपूरमध्ये आपल्या प्रियकरासोबत राहत असल्याचं आढळून आलं.
तक्रारीनुसार, फेसबुकवर भेटल्यानंतर आरोपी महिलेचे मागील एक वर्षापासून त्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र, जेव्हा पीडित पती आई आणि मुलीसह बैराकपूर येथील त्यांच्या घरी पोहोचला. तेव्हा तिनं घराबाहेर येण्यास नकार दिला. तर महिलेच्या कथित प्रियकरानं सासरच्या घरातून रोख रक्कम घेतल्याचा नकार दिला. महिलेनं दावा केली की ती फक्त बचत केलेले पैसे घेऊन घराबाहेर निघाली होती. तर या प्रकरणात पोलिसांचं म्हणणं आहे की, कोणतीही कारवाई सुरू करण्यापूर्वी ते महिला आणि तिच्या कथित प्रियकराची चौकशी करणार आहेत.
हेही वाचा -
- किडनी देऊन भावाचा जीव वाचवणं महिलेला पडलं महागात; संतापलेल्या पतीनं सौदी अरेबियातून व्हॉट्सअॅप वर दिला 'तलाक'
- याला म्हणतात जिद्द! प्रत्यारोपणसह किडनी दान करणाऱ्या नागरिकांनी मॅरेथॉनमध्ये घेतला सहभाग, 'हे' खास कारण
- Bilaspur Kidney Theft : किडनी चोरीच्या आरोपावरून जिल्हाधिकाऱ्यांनी मृतदेह काढला बाहेर