नवी दिल्ली - संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (Parliament Budget Session २०२५) तिसऱ्या दिवशी विविध मुद्द्यांवरून मोठा गदारोळ झाला. महाकुंभमधील चेंगराचेंगरीच्या घटनेसह अनेक मुद्द्यांवरून विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसदेत जोरदार घोषणाबाजी केली.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या २०२५-२६ च्या केंद्रीय अर्थसंकल्पावर आजपासून संसदेत चर्चा करण्यासाठी सरकारनं तयारी केली. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर दोन्ही सभागृहात चर्चा होणार होती. मात्र, अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान महाकुंभमधील चेंगराचेंगरी दुर्घटनेवर चर्चा करण्याचं आवाहन विरोधी पक्षांनी केलं. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी कोणतंही आश्वासन दिले नसले तरी संसदेच्या अजेंड्यावर सल्लागार समिती निर्णय घेईल, असे त्यांनी सांगितलं. तरीही चर्चा झाली नसल्यानं संसदेत गोंधळ झाला.
चर्चा करण्यासाठी निवडून दिलं- विरोधी पक्षांनी लोकसभेत गदारोळ केल्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी टीका केली. ते म्हणाले, "जनतेनं तुम्हाला टेबल फोडण्यासाठी, घोषणाबाजी करण्यासाठी आणि सभागृहाच्या कामकाजात अडथळा आणण्यासाठी खासदार म्हणून निवडून दिलं नाही. तर चर्चा करण्यासाठी तुम्हाला निवडून दिलं आहे." राज्यसभेत कामकाजादरम्यान महाकुंभ चेंगराचेंगरीच्या घटनेच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षाच्या खासदारांनी राज्यसभेतून सभात्याग केला.
गांधी कुटुंबाचा सोरोस यांच्याशी संबंध
- भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी संसदेबाहेर माध्यमांशी खळबळजनक दावा केला. ते म्हणाले, "मला १० प्रश्न उपस्थित करायचे असताना विरोधी पक्ष मला प्रश्न विचारू देत नाहीत. मी गांधी कुटुंब आणि जॉर्ज सोरोस यांच्यातील संबंध उघड करणार आहे. जॉर्ज सोरोस यांचा मुलगा ४ दिवस बांगलादेशात राहिला. बांगलादेशी घुसखोरांना भारतात आणून देशाचं विभाजन करण्यासाठी एक केंद्र बनवण्यात आलं आहे. मी हे उघड करणार आहे."
न्यायालयीन आयोगाकडून चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेची होणार चौकशी- मौनी अमावस्येच्या दिवशी प्रयागराज येथील संगमावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेत किमान ३० जणांचा मृत्यू झाला. तर सुमारे ६० जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय न्यायालयीन आयोग स्थापन करण्याचे योगी सरकारनं आदेश दिले आहेत. या आयोगानं एका महिन्याच्या आत योगी सरकारला चौकशी अहवाल सादर करणं अपेक्षित आहे.
हेही वाचा-