पुणे : रविवारी अहिल्यानगर येथे झालेल्या 67 व्या 'महाराष्ट्र केसरी' स्पर्धेत पुण्याचा पैलवान पृथ्वीराज मोहोळ विजयी झाला. स्पर्धा जरी मोहोळ यानं जिंकली असली तरी चर्चा मात्र पैलवान शिवराज राक्षेची सुरू आहे. रविवारी झालेल्या सामन्यानंतर पंचांशी हुज्जत घातल्याप्रकरणी पैलवान शिवराज राक्षे आणि पैलवान महेंद्र गायकवाड यांना कुस्तीगीर परिषदेनं तीन वर्षांसाठी निलंबित केलं. कुस्तीगीर परिषदेच्या या निर्णयानंतर पैलवान शिवराज राक्षे याचे वस्ताद अर्जुनवीर पुरस्कार विजेते काका पवार हे आक्रमक झाले आहेत. त्यांनी या निर्णयाचा निषेध करत 'महाराष्ट्र केसरी' स्पर्धाच बेकायदेशीर असून, खेळाडूंना देण्यात येणारे प्रमाणपत्र कुठल्याही कामाचं नसल्याचं सांगितलं. 'ईटीव्ही भारत'चे प्रतिनिधी सज्जाद सय्यद यांनी काका पवार यांच्यासोबत Exclusive संवाद साधला. त्यावेळी त्यांनी 'महाराष्ट्र केसरी' स्पर्धेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
काय म्हणाले वस्ताद काका पवार? : पैलवान शिवराज राक्षे याच्या बाबतीत जे काही निर्णय देण्यात आला त्याबाबत काका पवार म्हणाले की, "रविवारी कुस्ती बघायला गेलो नाही. कामाच्या निमित्तानं पुण्यातच होतो. पण सामना बघितल्यावर रेफ्री (पंच) यानं थांबायला पाहिजे होतं. पण असं न करता त्यानं थेट पृथ्वीराज मोहोळ याच्या बाजूनं निकाल दिला. जेव्हा राक्षे हा न्याय मागायला गेला तेव्हा, न्याय देण्यात आला नाही. रागात राक्षे यानं धक्काबुक्की केली. तसेच फायनलमध्ये तर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. हे अतिशय निंदनीय असून, जो काही निर्णय पैलवान शिवराज राक्षे आणि पैलवान महेंद्र गायकवाड यांच्याबाबतीत घेण्यात आला, त्याचा आम्ही निषेध करतो. या विरोधात संघटनेकडे दाद मागितली जाणार आहे."
खेळाडूंवर अन्याय होत आहे : काका पवार पुढं म्हणाले की, "रविवारी जे काही शिवराजच्याबाबतीत झालं, त्यात राजकारण करण्यात आलंय. 'महाराष्ट्र केसरी' स्पर्धाच बेकायदेशीर आहे. तसंच त्यांच्याकडून खेळाडूंना देण्यात येणारं प्रमाणपत्र देखील कोणत्याही कामाचं नाही आणि ते कुठेही ग्राह्य धरलं जात नाही. अजूनही महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेचं प्रमाणपत्र चालतं. खेळाडूंना बक्षीस मिळतं या हिशोबानं आम्ही त्यांना स्पर्धेला पाठवतो. मात्र, असं असताना देखील खेळाडूंवर अन्याय होताना पाहायला मिळत आहे."
हेही वाचा -