सांगली : 'महाराष्ट्र केसरी'च्या अंतिम सामन्यादरम्यान झालेल्या राड्याप्रकरणी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी वादग्रस्त विधान केलं. "पैलवान शिवराज राक्षे यानं लाथ मारण्याऐवजी खरंतर पंचांना गोळ्या घालायला पाहिजे होत्या," असं वादग्रस्त विधान पैलवान चंद्रहार पाटलांनी केलं.
पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळं हार पत्करावी लागली : 'महाराष्ट्र केसरी' कुस्ती स्पर्धेतील अंतिम सामना पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे यांच्यात झाला. मात्र, या सामन्यात पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळं आपल्याला हार पत्करावी लागल्याचा आरोप करत शिवराज राक्षेनं पंचांना लाथ मारली. याबद्दल कुस्ती क्षेत्रात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. लाथ मारल्याचा आरोप शिवराज राक्षे यानं फेटाळून लावले आहेत.
शिवराजनं पंचांना गोळ्या घालायला पाहिजे होत्या : डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी देखील पंच निर्णयावर जोरदार प्रतिक्रिया दिली. याबाबत बोलताना पैलवान चंद्रहार पाटील म्हणाले की, "माझ्यावर सुद्धा २००९ साली ट्रिपल महाराष्ट्र केसरी होताना अन्याय झाला होता. मी देखील २००९ साली ट्रिपल महाराष्ट्र केसरीची कुस्ती स्पर्धा खेळताना पंचांच्या वादग्रस्त निर्णयाला बळी पडलो होतो. त्यावेळी मी आत्महत्या करण्याच्या विचारात होतो. तसाच अन्याय ट्रिपल महाराष्ट्र केसरी होताना शिवराज राक्षेवर देखील झाला." "मला वाटतं शिवराज हा चुकला आहे. कारण, त्यानं पंचाला लाथ मारण्याऐवजी गोळया घालायला पाहिजे होत्या," असं वादग्रस्त विधान चंद्रहार पाटील यांनी केलं.
पृथ्वीराजचं मी अभिनंदन करतो : "पृथ्वीराज मोहोळचं मी अभिनंदन करतो. या सर्व प्रकरणात पृथ्वीराजची काही चूक नाही. मात्र, पंचाचा निर्णय वादग्रस्त आहे," अशी परखड प्रतिक्रिया चंद्रहार पाटील यांनी व्यक्त केली.
हेही वाचा :