बुलढाणा : नऊ महिन्यांची गर्भवती असलेल्या ३२ वर्षीय महिलेच्या गर्भातील अर्भकाच्या पोटात साडेचार महिन्यांचे गर्भ असल्याचं निदान जिल्हा महिला रुग्णालयात झालं होतं. या दुर्मीळ घटनेनं सर्वांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. स्त्री रुग्णालयात १ फेब्रुवारीला डॉक्टरांनी या महिलेची प्रसुती केली. यावेळी महिलेनं एका मुलास जन्म दिला. बाळ आणि माता दोघांचीही प्रकृती उत्तम असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भागवत भुसारी यांनी दिली.
बाळाला कोणताही धोका नाही : पाच लाखांमध्ये एक आढळणाऱ्या या प्रकाराला वैद्यकीय भाषेत 'फिटस इन फिटो' असं म्हटल जातं. नऊ महिन्यांची गर्भवती महिला काही दिवसांपूर्वी जिल्हा स्त्री रुग्णालयात तपासणी करण्यासाठी आली होती. यावेळी स्त्रीरोगतज्ञ डॉ. प्रसाद अग्रवाल यांनी सोनोग्राफी तपासणी करत असताना अर्भकाच्या पोटामध्ये आणखी एक अर्भक असल्याचं निदान केलं होतं. यावेळी बाळाच्या पोटात साडेचार महिन्यांचं अर्भक असल्याचं निदर्शनास आलं. निदानानंतर समुपदेशन करत कुठलाही धोका नसल्याचं गर्भवतीस सांगण्यात आलं होतं.
बाळावर अमरावतीत उपचार : १ फेब्रुवारीला प्रसुतीवेदना सुरू झाल्यानं महिलेस नातेवाइकांनी जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल केलं. कर्तव्यावरील डॉक्टरांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत पाटील यांना कळवलं. यासह ही बाब जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भागवत भुसारी यांना सांगण्यात आली. वेळ न दवडता महिलेची प्रसूती जिल्हा स्त्री रुग्णालयात करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला. सायंकाळी महिलेची प्रसुती करण्यात आली. महिलेच्या गर्भात पूर्णतः वाढ झालेल्या बाळाच्या पोटात आणखी एक गर्भ असल्यानं ही केस डॉक्टरांसाठी आव्हानात्मक होती. प्रसुती करत असताना स्त्रीरोगतज्ञ, भूलतज्ञ आणि बालरोगतज्ञांना सज्ज ठेवण्यात आलं होतं. प्रसुतीनंतर बाळ आणि बाळंतीण सुखरूप असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भागवत भुसारी यांनी दिली. बाळाला नवजात शिशू विभागात उपचार करण्यात आले. बाळाची प्रकृती स्थीर झाल्यानंतर त्याला अमरावतीच्या संदर्भीय सेवा रुग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भागवत भुसारी यांनी दिली.
'फिटस इन फिटू' म्हणजे काय? : निसर्गानं मानवाची अशाप्रकारे रचना केली आहे की, विशिष्ट वयानंतर आणि शारीरिक रचनेत बदल झाल्यानंतर महिला प्रजनन करू शकतात. मात्र, आईच्या पोटात बाळ आणि बाळाच्या पोटात बाळ हा प्रकार पाहून डॉक्टरही अचंबित झाले आहेत. नऊ महिन्यांच्या बाळाच्या पोटात आणखी एक बाळ वाढत असलेल्या गर्भधारणेला मेडिकल भाषेत 'फिटस इन फिटू' असं म्हणतात. अर्भकांमध्ये अर्भक असणं ही अशी घटना आहे. यात एका अर्भकाच्या पोटामध्ये दुसरं अर्भक वाढतं. साधारणतः पाच लाख गर्भवती महिलांमध्ये अशी एखादी केस आढळते. मात्र त्या बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याला अडचणी निर्माण होऊ शकतात अशी प्रतिक्रिया जिल्हा शल्य चिकित्सक भागवत भुसामरी यांनी दिली.
हेही वाचा :