Is Diabetic Patients Can Eat Papaya: सर्वच ऋतूंमध्ये उपलब्ध असणार फळ म्हणजे पपई. गोड, चवदार आणि पिवळ्या रंगाची पिकलेली पपई अनेक पोषक घटकांचा खजिना आहे. यामध्ये ए, सी, ई, विटामिन्स; फोलेट, मॅग्नेशियम, पोटॅशियम, तांबे आणि अँटीऑक्सिडंट्सनं सारखे पोषक तत्व आहेत. जे आपल्या शरीराला अनेक फायदे प्रदान करण्यात मदत करते. परंतु मधुमेह आणि उच्चरक्तदाब असलेल्या लोकांनी पपई खावी काय? हा प्रश्न अनेकांना पडतो. याविषयी अनेकांच्या मनात असलेल्या शंकेबाबत आरोग्य तज्ञांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेऊया.
- पपईचे आरोग्यदायी फायदे
- पचनक्रिया सुधारते: रोज पपई खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते. तज्ञांचे म्हणणे आहे की, त्यातील पपेन हे एन्झाइम पचनाच्या समस्यांवर प्रभावीपणे काम करते.
- हृदयाच्या आरोग्यास मदत करते: पपईमध्ये अँटिऑक्सिडेंट लाइकोपीन आणि व्हिटॅमिन सी जास्त असते. हे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप चांगले आहे. पपई रोज खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो. यातील फायबर कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यात चांगले काम करते, असे तज्ञ सांगतात.
- कर्करोग प्रतिबंधित करते: अभ्यासातून असे दिसून आले आहे की या फळामध्ये असलेले लाइकोपीन, एक शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट, विशिष्ट प्रकारच्या कर्करोगास प्रतिबंध करू शकते.
- रोगप्रतिकारशक्ती वाढवते: पपईचे सेवन केल्याने शरीराला मुबलक जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स मिळतात. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
- नैसर्गिकरित्या डिटॉक्स: पपईमध्ये फायबर आणि पाण्याचे प्रमाण जास्त असते. हे नैसर्गिक डिटॉक्सिफायर म्हणून काम करते. रिकाम्या पोटी पपईचे सेवन केल्याने शरीरातील साचलेली अशुद्धता सहज बाहेर पडते.
- मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेले लोक पपईचे सेवन करू शकतात का?
मधुमेहाचा त्रास असलेले लोक पपईचे सेवन करू शकतात. मात्र, त्यांनी काही खबरदारी घ्यायला हवी. पपईमध्ये मध्यम ग्लायसेमिक इंडेक्स असतो. उच्च ग्लायसेमिक फळांच्या तुलनेत पपईचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी लवकर वाढत नाही. पपईतील फ्लेव्होनॉइड्स इन्सुलिन संवेदनशीलता सुधारतात. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते, असे तज्ञ म्हणतात.
- जर्नल ऑफ फंक्शनल फूड्समध्ये प्रकाशित 2019 च्या अभ्यासात असे आढळून आले की पपई इंसुलिन संवेदनशीलता वाढवते आणि जळजळ कमी करते. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासातही हेच स्पष्ट झाले आहे (संशोधन अहवालासाठी येथे क्लिक करा).
पपई हे फळ केवळ मधुमेहींसाठीच नाही तर उच्च रक्तदाबाने ग्रस्त असलेल्यांसाठी देखील फायदेशीर आहे. कारण पपईमध्ये पोटॅशियम भरपूर असते. शरीरातील अतिरिक्त सोडियम काढून टाकण्यात आणि उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यात ते महत्त्वाची भूमिका बजावते. तथापि, तज्ञ पपईचे जास्त प्रमाणात सेवन न करण्याचा सल्ला देतात. ते कमी प्रमाणात सेवन करणे आरोग्यासाठी चांगले आहे. मधुमेह आणि उच्च रक्तदाबाने ग्रस्त असलेल्यांनी पपई खाण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे चांगले असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)
संदर्भ
https://pmc.ncbi.nlm.nih.gov/articles/PMC10142885/