आग्रा Shiv Jayanti 2024 :छत्रपती शिवाजी महाराजांचं आग्र्याशी एक वेगळं नातं आहे. याच ठिकाणी मुगल बादशाह औरंगजेबानं त्यांना कैद करून ठेवलं होतं. मात्र महाराजांनी गनिमी काव्याचा वापर करून आपली सुटका करून घेतली होती.
भव्यदिव्य कार्यक्रम होणार : आता या आग्र्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाणार आहे. अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानच्या वतीनं हा सोहळा संपन्न होईल. आग्रा येथील ज्या लाल किल्ल्यातून महाराजांनी औरंगजेबाच्या हातावर तुरी देत स्वतःची सुटका केली होती, त्याच ठिकाणी हा सोहळा होणार आहे. यावेळी पाळणा, लेझर शो, पोवाडे असा भव्यदिव्य कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित राहतील.
गेल्या वर्षीपासून परंपरा सुरू झाली : अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानच्या वतीनं हा आगळावेगळा सोहळा साजरा केला जाणार आहे. येथे गेल्या वर्षीपासून ही परंपरा सुरू झाली. या वर्षी देखील हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जाईल. आजच्या पिढीला महाराजांचा इतिहास कळावा, यासाठी हा प्रयत्न असल्याचं कार्यक्रमाचे आयोजक विनोद पाटील यांनी सांगितलं.
महाराजांच्या जीवनावर आधारित लेझर शो : शिवजन्मोत्सवानिमित्त आग्र्यातील लाल किल्ल्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित पोवाडे आणि लेझर शो दाखवला जाईल. याद्वारे महाराजांचा महाराष्ट्रातून आग्र्यापर्यंतचा प्रवास आणि तेथून सूटका कशी झाली, हे दाखवण्यात येणार आहे. प्रतिष्ठानातर्फे रिल्स बनवण्याची स्पर्धा घेण्यात आली होती. यावेळी या स्पर्धेत विजयी झालेल्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. आज रात्री 7 वाजता हा कार्यक्रम सुरू होईल. यासाठी पुरातत्त्व विभाग आणि राज्य सरकारकडून विशेष परवानगी मिळाली आहे.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती : आजच्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, तसेच शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती असेल. तसेच कार्यक्रमाला सर्व पक्षीय नेते उपस्थित राहतील, अशी माहिती अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठाननं दिली आहे.
हे वाचलंत का :
- शिवनेरीवरून मराठा आरक्षणाबाबत मोठं अपडेट, जाणून घ्या काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?
- मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव सोहळा पडला पार; शिवनेरी गडावर शिवप्रेमींची गर्दी
- शिवजयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींचं महाराजांना अनोख्या शैलीत अभिवादन, दोन मिनिटांचा व्हिडिओ केला पोस्ट