प्रयागराज (लखनौ) - महाकुंभ मेळाव्यात ( mahakumbh 2025) येणाऱ्या भाविकांना रेल्वेचं तिकीट बुक करण्यासाठी रेल्वेकडून क्यूआर कोड स्कॅनची सुविधा देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे ही क्युआर कोड हा रेल्वे कर्मचाऱ्यांच्या जॅकेटवर असणार आहे.
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभ मेळाव्याचं जानेवारीत आयोजन होणार आहे. हा महाकुंभ मेळावा बारा वर्षांतून एकदा येतो. त्यासाठी करोडो भाविक येतात, हे लक्षात घेऊन प्रशासनाला मोठी तयारी करावी लागत आहे. महाकुंभमध्ये रेल्वेचं तिकीट आरक्षित करण्यासाठी रेल्वे स्थानकांसह महत्त्वाच्या ठिकाणी रेल्वे कर्मचारी तैनात असणार आहेत. भाविकांना रेल्वे कर्मचाऱ्यांच्या जॅकेटवर घातलेल्या स्कॅनरचा वापर करून तिकीट काढणार आहेत. यापूर्वी रेल्वेनं भाविकांसाठी 13 हजार विशेष गाड्या सुरू केल्या आहेत.
- तिकीट काढणं सोपे होणार-प्रयागराज हे उत्तर मध्य रेल्वे (NCR) झोनच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली येते. आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे तिकीट प्रक्रिया सुलभ करण्यासाठी विभागीय रेल्वेनं जॅकेटवरून स्कॅन सुरू करण्याचा उपक्रम सुरू केला आहे.
QR कोड स्कॅनरद्वारे तिकीट कसे बुक करावे?तिकीट बुक करण्यासाठी प्रवाशांना फक्त रेल्वे कर्मचाऱ्यांच्या हिरव्या जॅकेटवरील QR कोड स्कॅन करावा लागेल. स्कॅन केल्यानंतर, त्यांना त्यांच्या स्मार्टफोनवर अनारक्षित तिकीट प्रणाली (UTS) मोबाइल अॅप डाउनलोड करण्यासाठी लिंक मिळेल. याद्वारे प्रवासी तिकीट काढू शकतात. तसेच इतर सुविधांचा लाभ घेऊ शकतात.
भाविकांची गर्दीपासून सुटका होणार- महाकुंभादरम्यान रेल्वे स्थानकावर लांबच लांब रांगा लागणार आहेत. अशा स्थितीत डिजिटल पेमेंटद्वारे तिकीट बुक केल्यानं भाविकांच्या वेळेची बचत होणार आहे. तसेच महाकुंभदरम्यान येणाऱ्या लाखो भाविकांची गर्दीपासून सुटका होणार आहे. नवीन उपक्रम डिजिटल इंडियाच्या दिशेने टाकलेले पाऊल ठरेल आणि महाकुंभ 2025 साठी येणाऱ्या भाविकांसाठी मोठा दिलासा देणारा ठरेल.
40 कोटींहून अधिक भाविक येण्याची शक्यता- प्रयागराजमध्ये 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी या कालावधीत 45 दिवस प्रयागराज येथे महाकुंभ मेळावा असणार आहे. धार्मिक उत्सवात जगभरातून 40 कोटींहून अधिक भाविक आणि पर्यटक उपस्थित राहतील, असा अंदाज आहे. महाकुंभ मेळाव्यात भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि आध्यात्मिक परंपरा दिसून येणार आहे.
रेल्वेनं 10 जानेवारी ते 28 फेब्रुवारी दरम्यान 10,100 नियमित गाड्यांसह 3,124 विशेष रेल्वे चालवण्यात येणार असल्याचं जाहीर केलं. संभाव्य गर्दी लक्षात घेऊन NCR अंतर्गत 278 तिकीट काउंटर उभारले जाणार आहेत.
IRCTC कडून महाकुंभ मेळाची तयारीमहाकुंभ मेळा 2025 च्या तयारीसाठी, भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनकडून (IRCTC) 1 लाखाहून अधिक प्रवाशांना राहण्याची सुविधा देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्याचबरोबर आयआरसीटीसीनं त्रिवेणी संगमाजवळ महाकुंभ ग्रामचे बांधकाम पूर्ण केलं आहे.10 जानेवारी ते 28 फेब्रुवारी या कालावधीत महाकुंभ ग्राम मुक्कामासाठी ऑनलाइन बुकिंग सुरू राहणार आहे. आयआरसीटीसीच्या वेबसाइटद्वारे आरक्षण करता येणार आहे.
हेही वाचा-