लखनऊ Narendra Modi Azamgarh Visit today : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आझमगड आणि गाझीपूरला भेट देणार आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आझमगडमधील विद्यापीठ आणि विमानतळाचं उद्घाटन करणार आहेत. तर गाझीपूरमधील सोनवाल ते घाट या नवीन रेल्वेमार्गाचं उद्घाटनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आठ राज्याला एकूण 34 हजार 676.29 कोटी रुपयांच्या 782 प्रकल्पाची भेट देणार आहेत.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी घेतला आढावा :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आझमगड दौऱ्याच्या एक दिवस आधी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आझमगडच्या विकास कामाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी विकासकामांची माहिती घेतली. आझमगढमध्ये उद्घाटन करण्यात येणाऱ्या प्रकल्पांमध्ये राज्य विद्यापीठ, मंडुरी विमानतळ, रेल्वे मार्ग, रस्ते वाहतूक, गृहनिर्माण, आदी प्रकल्पांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं विमान मंडुरी विमानतळावरच उतरणार आहे. येथून काही अंतरावर उद्घाटन आणि पायाभरणी समारंभाचं आयोजन करण्यात आलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यात इतके राहणार हेलिकॉप्टर :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आझमगड दौऱ्याची जय्यत तयारी करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत असल्यानं भंवरनाथ ते मंडुरी विमानतळाच्या दुतर्फा मोठमोठी होर्डींग्ज लावण्यात आली आहेत. दुभाजकावर भाजपाचे झेंडे लावण्यात आल्यानं शहर भाजपामय झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात तब्बल 12 पेक्षांही जास्त हेलिकॉप्टर येण्याची शक्यता आहे. त्यामुळं मंडुरी विमानतळावर हेलिपॅड बांधले जात आहेत.
पंतप्रधानांच्या दौऱ्यात राहणार तगडी सुरक्षा व्यवस्था :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आझमगड इथल्या दौऱ्यात तगडी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. वाराणसीचे झोनचे पोलीस महानिरीक्षक पीयूष मोरडिया यांनी जाहीर सभेच्या ठिकाणाची पाहणी केली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. यावेळी बोलताना पोलीस महानिरीक्षक पीयूष मोरडिया म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात तगडी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यात त्रिस्तरिय सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली आहे. विमानतळाच्या आजूबाजूच्या परिसरात चोख तपासणी करण्यात आली आहे," असंही त्यांनी यावेळी सांगितलं. "मंडुरी विमानतळाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली आहे," असं जिल्हाधिकारी विशाल भारद्वाज यांनी सांगितलं.
हेही वाचा :
- "मोदींच्या चेहऱ्यानं सर्व जागा जिंकू"; भाजपाच्या प्रचार रथाला मुंबईत सुरुवात
- पंतप्रधान मोदींची काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात हत्तीवर बसून 'जंगल सफारी'; कॅमेरा घेत स्वतः काढले फोटो
- पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी परदेशी पिता-पुत्रांची अनोखी शक्कल, वाचा कसं गाठलं काझीरंगा पार्क?