भुवनेश्वर Menstrual Leave In Odisha :महिलांना मासिक पाळीसाठी रजा देण्यात येण्याची मागणी मागील अनेक दिवसांपासून देशभरात करण्यात येत आहे. मात्र अद्यापही या मागणीची सरकार दरबारी दखल घेण्यात आली नाही. मात्र ओडिशाच्या सरकारनं आपल्या महिला कर्मचाऱ्यांना स्वातंत्र्य दिन 2024 ची मोठी भेट दिली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात ओडिशाच्या उपमुख्यमंत्री प्रवती परिदा यांनी ही घोषणा केली आहे. त्यामुळे खासगी आणि सरकारी कार्यालयात कार्यरत असलेल्या लाखो महिलांना या योजनेचा फायदा होत आहे. महाराष्ट्रात मात्र अशी योजना राबवण्यात उदासिनता दिसून येत आहे.
उपमुख्यमंत्र्यांनी केली एका दिवसाच्या सुटीची घोषणा :कटक इथल्या जिल्हास्तरीय स्वातंत्र्य दिनाच्या समारंभात ओडिशाच्या उपमुख्यमंत्री प्रवती परिदा यांनी ही घोषणा करुन महिलांना मोठं गिफ्ट दिलं. राज्य सरकारच्या कर्मचारी आणि खासगी क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांनाही मासिक पाळीच्या काळात एक दिवस सुटी देण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री परिदा म्हणाल्या की, "आधी मासिक पाळीच्या काळात सुटी देण्यात येत नव्हती. मात्र आता महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीच्या काळात पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी रजेचा लाभ घेता येणार आहे. कोणत्या दिवशी सुटी घ्यायची याबाबत महिलांनी ठरवायचं आहे. ही योजना सरकारी आणि खासगी या दोन्ही क्षेत्रांमधील महिला कर्मचाऱ्यांना लागू होईल."