लखनौ:राम मनोहर लोहिया नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीच्या १९ वर्षीय विद्यार्थिनीचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळला. ही विद्यार्थिनी आयपीएस अधिकाऱ्याची मुलगी आहे. शनिवारी रात्री वसतिगृहाच्या खोलीत तिचा मृतदेह आढळून आल्याचं पोलिसांनी सांगितलं. अनिका रस्तोगी असे मृत विद्यार्थिनीचं नाव आहे. ती बीए एलएलबी (ऑनर्स) तृतीय वर्षाची विद्यार्थिनी होती. हृदयविकाराच्या झटक्यानं तिचा मृत्यू झाल्याची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली.
अनिका रस्तोगीनं शनिवारी संध्याकाळी इतर विद्यार्थ्यांसह समुपदेशनात भाग घेतला होता. रात्री जेवण करून ती तिच्या हॉस्टेलच्या खोलीत गेली. रात्री दहाच्या सुमारास तिची रुममेट खोलीजवळ पोहोचली. अनिकाला आवाज देऊन आणि बराच वेळ दार ठोठावूनही तिनं दरवाजा उघडला नाही. मोठ्या प्रयत्नानंतर खोलीचा दरवाजा उघडला. तेव्हा रुममेटला अनिका जमिनीवर पडल्याचं दिसून आलं. तिला उपचाराकरिता तातडीनं अपोलो मेडिक्स रुग्णालयात नेण्यात आलं. तेथे डॉक्टरांनी अनिका रस्तोगीला मृत घोषित केले.
- एडीसीपी पूर्व पंकज सिंह यांनी सांगितले, " नोएडातील एलएलबीच्या तिसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्याचा वसतिगृहाच्या खोलीत संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर या प्रकरणात कायदेशीर कारवाई केली जाईल. प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत."