नवी दिल्ली- आदिवासी समुदायातील भाजपाच्या खासदारांनी राज्यसभेच्या सभापतींना पत्र लिहून खासदार सोनिया गांधी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी केली. राज्यसभा खासदार सोनिया गांधी यांनी राष्ट्रपतींबद्दल वापरलेले शब्द त्यांच्या 'उच्चभ्रू' आणि 'आदिवासीविरोधी' मानसिकतेचं प्रतिक असल्याची टीका भाजपाच्या आदिवासी खासदारांनी केली.
संसदीय नीतिमत्ता आणि आचारसंहितेसाठी सोनिया गांधी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करा, अशी भाजपाच्या खासदारांनी राज्यसभेच्या सभापतींकडं मागणी केली. आदिवासी आणि गरीबांचा संघर्ष अद्याप त्यांना समजला नाही, अशी टीका खासदारांनी राज्यसभेच्या अध्यक्षांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.
काय म्हटले पत्रात? "आपल्या राष्ट्राच्या सर्वोच्च घटनात्मक अधिकार असलेल्या भारताच्या राष्ट्रपतींच्या प्रतिष्ठेला कमी लेखणारे विधान गंभीर आणि चिंतादायक आहे. अशा प्रकारच्या टिप्पण्या केवळ पदाच्या प्रतिष्ठेलाच कमी करत नाहीत तर संसदीय प्रक्रिया आणि परंपरांच्या पावित्र्याचंही उल्लंघन करतात. या प्रकरणाची दखल घेणं आणि शिस्तभंगाची कारवाई सुरू करणं ही शिष्टाचाराची मूल्ये मजबूत करण्यासाठीदेखील अत्यावश्यक आहे. तसंच ही कारवाई लोकशाही संस्थांच्या प्रभावी कामकाजासाठी, पायाभूत असलेल्या शिष्टाचार आणि परस्पर आदराच्या तत्त्वांना बळकटी देण्यासाठीदेखील अत्यावश्यक आहे.
सोनिया गांधींवर भाजपाकडून टीका- २०२५-२६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात करताना राष्ट्रपती मुर्मू यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांना संयुक्तपणं संबोधित केल्यानंतर सोनिया गांधी यांनी राष्ट्रपतींना बिचारी म्हटलं होतं. त्यावरून भाजपामधील अनेक नेत्यांनी सोनिया गांधींवर निशाणा साधला. राष्ट्रपतींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानं बिहारमध्ये एका वकिलानं सोनिया गांधींसह राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याविरोधात न्यायालयात तक्रार दाखल केली आहे.
हेही वाचा-