नवी दिल्ली Lok Sabha Election Exit Poll : लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी 1 जून रोजी मतदान पार पडलं. आता 4 जूनला निकाल लागणार (Exit Poll 2024 Lok Sabha) आहेत. मात्र, निकालापूर्वी एक्झिट पोल जाहीर होत आहेत. यामध्ये जनता यावेळी सत्तेच्या चाव्या कोणाकडं सोपवणार हे पाहावं लागणार आहे. निवडणुकीदरम्यान, विविध माध्यम संस्थानांनी निकालांबद्दल अंदाज व्यक्त केलाय. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यानंतर निवडणुकीचा अंदाज जाहीर केला जातो. एक्झिट पोलचे अंदाज कितपत खरे आहेत, हे निवडणुकीचे निकाल आल्यानंतरच कळू शकेल.
'एक्झिट पोल'वर घातली होती बंदी : निवडणूक आयोगानं 28 मार्च 2024 च्या आपल्या आदेशात म्हटलंय की, 19 एप्रिल 2024 (सकाळी 7) ते 1 जून 2024 (संध्याकाळी 6:30) पर्यंत एक्झिट पोलवर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतरच एक्झिट पोल जाहीर करू शकतात.
'एक्झिट पोल'चा इतिहास काय आहे? : एका अहवालानुसार, डच समाजशास्त्रज्ञ मार्सेल वॉन डॅम यांनी एक्झिट पोलची सुरवात केली होती. वॉन डॅम यांनी 15 फेब्रुवारी 1967 रोजी प्रथम या पद्धतीचा वापर केला होता. त्यावेळी नेदरलँडमध्ये झालेल्या निवडणुकांबाबत त्यांची अंदाज अचूक ठरला होता. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ओपिनियन (IIPU) चे प्रमुख एरिक डी'कोस्टा यांनी भारतात एक्झिट पोलची 1996 मध्ये सुरवात केली होती. त्यावेळी दूरदर्शननं सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज (CSDS) ला देशभर एक्झिट पोल घेण्यास परवानगी दिली होती. याआधीच्या एक्झिट पोलमध्ये भाजपा लोकसभा निवडणुकीत विजयी होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती आले, तेव्हा भाजपानं विजय मिळवला होता. यानंतर एक्झिट पोलचा कल वाढत गेला. 1998 मध्ये प्रथमच एका खासगी वृत्तवाहिनीनं एक्झिट पोलच प्रसारण केलं होतं.
काय आहे 'ओपिनियन पोल' आणि 'एक्झिट पोल'मध्ये फरक : सर्वेक्षण संस्था निवडणुकीपूर्वी ओपिनियन पोल करतात. त्यात सर्व नागरिकांचा समावेश असतो. संबंधित नागरिक मतदार असो, वा नसो त्याचं जनमत जाणून घेतलं जातं. निवडणुकीच्या दृष्टिकोनातून विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जनतेचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो. नागरिक सरकार तसंच विरोधकांच्या कामावर समाधानी आहे की नाही, यातून जाणून घेतलं जातं.
'एक्झिट पोल' कसा करतात : मतदानाच्या दिवशी एक्झिट पोल केला जातो. मतदार मतदान करण्यासाठी मतदान केंद्राबाहेर पडत असताना, त्यांनी कोणत्या पक्षाला किंवा उमेदवाराला मतदान केलं, याबाबत एक्झिट पोलचे सदस्य मतदारांकडून माहिती घेतात. यानंतर, मतदारांकडून मिळालेल्या डेटाचं विश्लेषण केलं जातं. त्यावरून निवडणूक निकालाच्या अंदाजाचं भाकीत वर्तवण्यात येतं. निवडणुका संपण्यापूर्वी एक्झिट पोल जारी करता येणार नाही. निवडणुका संपण्यापूर्वी किंवा निवडणुकीच्या काळात कोणत्याही मीडिया हाऊसनं किंवा एजन्सीनं एक्झिट पोल प्रसिद्ध केल्यास निवडणूक आयोग त्यावर कारवाई करू शकतो.
2019 मधील 'एक्झिट पोल' किती अचूक :बहुतेक एक्झिट पोलनं 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपा आणि एनडीएच्या प्रचंड विजयाची भविष्यवाणी केली होती. बहुतांश एक्झिट पोलमध्ये भाजपा आणि एनडीएला 300 हून अधिक जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए आघाडीला जवळपास 100 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यामुळं गेल्या लोकसभा निवडणुकीचा अंदाज पहाता एक्झिट पोल अचूक ठरले होते.
हे वाचलंत का :
- धनंजय मुंडेंवर टीका करताना विजय वडेट्टीवार यांची जीभ घसरली, वाद पेटणार? - Vijay Wadettiwar
- 'मला मृत्यूचा व्यापारी, घाणेरड्या नाल्यातला किडा...; पंतप्रधान मोदी विरोधकांवर संतापले! - Lok Sabha Election 2024
- सावरकरांवरील आक्षेपार्ह वक्तव्य राहुल गांधींना भोवणार? पुणे पोलिसांनी न्यायालयात दिली महत्त्वाची माहिती - RAHUL GANDHI News