रुद्रप्रयाग (उत्तराखंड) Kedarnath Route Pilgrims Died : केदारनाथच्या पायी मार्गावर दगड आणि मलबा पडल्यानं तीन यात्रेकरूंचा मृत्यू झालाय. तर पाच प्रवासी जखमी झाले आहेत. केदारनाथ पादचारी मार्गावरील चिरबासा येथे हा अपघात झाला. जखमी प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
बचाव कार्य सुरू :या घटनेची अधिक माहिती देत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदन सिंह राजवार यांनी सांगितलं की, "केदारनाथ यात्रेच्या मार्गावर चिरबासाजवळील टेकडीवरून मोठे दगड पडल्याची माहिती सकाळी साडेसातच्या सुमारास आपत्ती नियंत्रण कक्षाला मिळाली. काही प्रवासी ढिगाऱ्याखाली दबल्याची माहिती मिळाली. ही माहिती मिळताच एनडीआरएफ, डीडीआरएफ, वायएमएफ आणि प्रशासनाच्या पथकांसह यात्रा मार्गावर तैनात असलेले सुरक्षा कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. सध्या या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे."
मृतांमध्ये महाराष्ट्रातील दोघांचा समावेश : या अपघातात तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. त्यापैकी दोघं महाराष्ट्रातील तर एक रुद्रप्रयागचा होता. हे सर्व लोक केदारनाथ धामच्या दिशेनं जात होते. तर काही जखमी प्रवाशांची प्रकृतीदेखील चिंताजनक आहे. अपघातस्थळी प्रशासनानं दोन्ही बाजूनं सुरक्षा कर्मचारी तैनात केलेत.