बीड : संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात आज एसआयटीनं वाल्मिक कराड याला बीडच्या न्यायालयात हजर केलं. यावेळी न्यायालयानं एसआयटीवर प्रश्नांची सरबत्ती केली. केवळ फोन कॉलच्या आधारे वाल्मिक कराडला खंडणी आणि खून प्रकरणात आरोपी केलं का, असा सवाल न्यायालयानं केला. त्यामुळे तपास अधिकाऱ्यांची चांगलीच कोंडी झाली. मात्र दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं वाल्मिक कराड याला 7 दिवसांची एसआयटी कोठडी ठोठावली. अवादा कंपनीला मागितलेल्या खंडणीला अडथळा ठरल्यामुळेच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आल्याचा दावा यावेळी अधिकाऱ्यांनी केला.
वाल्मिक कराडला 7 दिवसांची एसआयटी कोठडी : वाल्मिक कराड याला आज सकाली केज न्यायालयात न नेता बीड इथल्या जिल्हा सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी एसआयटी अधिकाऱ्यांनी वाल्मिक कराड याच्यावर विविध आरोप केले. सुदर्शन घुले, विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांच्यात संतोष देशमुख यांच्या हत्येच्या दिवशी 20 मिनिटं फोनवर चर्चा झाल्याचा आरोप एसआयटीच्या वतीनं न्यायालयात करण्यात आला. दोन्ही बाजुंचे युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं वाल्मिक कराड यांना 7 दिवसांची एसआयटी कोठडी ठोठावली आहे.
वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यात फोनवर चर्चा : आज बीड जिल्हा सत्र न्यायालयात वाल्मिक कराड याला 02 वाजता हजर केल्यानंतर 03 वाजता या प्रकरणी सुनावणी सुरू झाली. सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे आणि वाल्मिक कराड याचे वकील अशोक कवडे यांच्यात जोरदार युक्तिवाद झाला. यावेळी एसआयटीचे अधिकारी अनिल गुजर यांनी न्यायालयाला हत्येच्या दिवशी सुदर्शन घुले याच्याबरोबर वाल्मिक कराडचं बोलणं झालं, अशी माहिती मिळत आहे. सुदर्शन घुले, विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांच्यात दहा मिनिट संभाषण झालं, असा दावा केला.
वाल्मिक कराडला फोन कॉलवरुन आरोपी केलं का, न्यायालयाचा सवाल : एसआयटीच्या वतीनं वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि विष्णू चाटेंमध्ये फोनवर संभाषण झाल्याचा दावा करण्यात आला. यावेळी "यांनी फोन कॉलवर वाल्मिक कराड याला आरोपी केलं आहे का, असा सवाल न्यायाधीश सुरेखा पाटील यांनी आरोपीचे वकील अशोक कवडे यांना केला. वाल्मिक कराड याची अटक बेकायदेशीर असल्याचं वाल्मिक कराडचे वकील अशोक कवडे यांनी न्यायालयाला सांगितंल. कोणत्याही आरोपीनं वाल्मिक कराड याचं नाव घेतलेलं नाही, असा युक्तीवाद वाल्मिक कराड याचे वकील अशोक कवडे यांनी केला. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड याच्या विरोधात कुठलाही ठोस पुरावा नाही, असं वकिलांनी यावेळी न्यायालयात सांगितलं.
वार्तांकनावरुन कराडवर गुन्हा दाखल केला का, न्यायालयाचा सवाल : वाल्मिक कराड याच्यावर अवादा कंपनीला 2 कोटीची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र आज न्यायालयानं एसआयटीवर प्रश्नांची सरबत्ती केली. सध्या मीडियावर चाललेल्या वार्तांकनावरच तुम्ही वाल्मिक कराड याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केलेला आहे का, असा सवाल न्यायाधीशांनी एसआयटी अधिकाऱ्यांना केला आहे. यावेळी सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी युक्तीवाद करत आरोपीचं अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली, असं न्यायालयात सांगितलं गेलं.
हेही वाचा :