रांची (झारखंड) ED Arrested Hemant Soren :झारखंडमध्ये राजकीय घडामोडी वेगानं बदलत आहेत. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीनं अटक केली. ईडीनं बुधवारी हेमंत सोरेन यांची सुमारे 7 तास चौकशी केली होती. चौकशीनंतर सोरेन यांनी राजभवनात जाऊन राज्यपालांकडं मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द केला होता. त्यानंतर त्यांना ईडीनं अटक केली.
हेमंत सोरेन यांचा राजीनामा :मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी बुधवारी रात्री मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलाय. हेमंत सोरेन यांची ईडीनं बुधवारी 7 तास चौकशी केली. चौकशीनंतर त्यांनी आपला राजीनामा दिलाय. त्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला होता. 'जेएमएम'चे ज्येष्ठ नेते चंपाई सोरेन यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे. राजभवनात पोहोचल्यानंतर चंपाई सोरेन यांनी सरकार स्थापनेचा दावा केलाय. चंपाई सोरेन यांनी 43 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र राज्यपालांना सादर केलंय.
चंपाई सोरेन नवे मुख्यमंत्री? : हेमंत सोरेन यांच्या अटकेनंतर त्यांची पत्नी कल्पना सोरेन झारखंडच्या मुख्यमंत्री बनतील अशी चर्चा रंगली होती. मात्र, सोरेन यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे आपले वरिष्ठ सहकारी चंपाई सोरेन यांच्याकडं सोपवली आहेत. मनी लाँड्रिंग व जमीन घोटाळ्याप्रकरणी हेमंत सोरेन यांची ईडीकडून चौकशी सुरू होती. सात तासांच्या चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली. हेमंत सोरेन १५ दिवस रांचीमध्ये ईडीच्या कोठडीत राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोरेन यांनी दिल्लीतून रांचीत येत झारखंड मुक्ती मोर्चाच्या वरिष्ठ नेत्यांची आणि सहकारी आमदारांची बैठक घेतली होती. या बैठकीत चंपाई सोरेन यांना सभागृह नेता म्हणून निवडण्यात आले व त्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
कोण आहेत चंपाई सोरेन? : मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या राजीनाम्यानंतर चंपाई सोरेन झारखंडचे नवे मुख्यमंत्री बनणार आहेत. विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांची नेतेपदी निवड करण्यात आली. चंपाई सोरेन हे सोरेन कुटुंबाच्या अगदी जवळचे मानले जातात. चंपाई सोरेन सलग 4 टर्मपासून सरायकेला विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत. याआधी त्यांना वर्ष 2000 मध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. भाजपाचे तत्कालीन उमेदवार अनंत राम तुडू यांनी त्यांचा पराभव केला होता. मात्र तेव्हापासून ते सातत्यानं विधानसभा निवडणुकीत विजयी होत आले आहेत. 2010, 2013 आणि 2019 मध्ये ते झारखंड सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीही राहिले आहेत.
सामान्य शेतकरी कुटुंबाचा वारसा : चंपाई सोरेन एका सामान्य शेतकरी कुटुंबातून येतात. ते त्यांच्या चार भावंडांमध्ये सर्वात मोठे आहेत. त्यांचे वडील सरायकेला-खरसावन जिल्ह्यातील जिलिंगगोरा गावात शेती करायचे. चंपाई वडिलांना शेतीत मदत करत असे. त्यांनी सरकारी शाळेत दहावीपर्यंत शिक्षण घेतलं आहे. त्यांचं लहान वयातच मानको यांच्याशी लग्न झालं. चंपाई सोरेन यांना 3 मुलं आणि 2 मुली आहेत. चंपाई सोरेन 2010 ते 2013 पर्यंत भाजपा नेते अर्जुन मुंडा यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते. मंत्रीमंडळात त्यांना महत्त्वाची मंत्रिपदं देण्यात आली होती. यानंतर झारखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. नंतर राज्यात झामुमोचं सरकार स्थापन झालं आणि त्यांच्याकडे अन्न, नागरी पुरवठा आणि वाहतूक मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली. ते 13 जुलै 2013 ते 28 डिसेंबर 2014 पर्यंत मंत्री होते.
हेही वाचा -
- कोण आहेत 'झारखंड टायगर' चंपाई सोरेन? हेमंत सोरेन यांच्या जागी बनणार राज्याचे नवे मुख्यमंत्री
- झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचा राजीनामा, ईडीनं घेतलं ताब्यात; चंपाई सोरेन नवे मुख्यमंत्री