मुंबई - प्रसिद्ध चित्रपट निर्माते दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचं आज 23 डिसेंबर रोजी वयाच्या 90 व्या वर्षी निधन झालं. संध्याकाळी 6.30 वाजता त्यांचं निधन झाले. किडनीशी संबंधित आजारामुळं त्यांचं निधन झालं. या वृत्ताला त्यांची मुलगी पिया बेनेगल यांनी दुजोरा दिला आहे. श्याम बेनेगल यांनी मुंबईतील वोक्हार्ट रुग्णालयात सायंकाळी 6.30 वाजता अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
या अचानक आलेल्या बातमीनं त्यांचे सर्व चाहते शोकाकूल झाले आहेत. त्यांच्या जाण्याने हिंदी चित्रपटसृष्टीचं मोठं नुकसान झालं आहे. श्याम बेनेगल यांनी 9 दिवसांपूर्वीच त्यांचा 90 वा वाढदिवस साजरा केला होता. 14 डिसेंबरला त्यांचा वाढदिवस होता. मात्र, आता अचानक आलेल्या या बातमीने चाहत्यांना धक्का बसलाय.
श्याम बेनेगल यांचा जन्म 1934 मध्ये सिकंदराबाद येथे झाला. कॉपी रायटर म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि नंतर आपल्या मेहनतीने आणि कामाच्या जोरावर त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत मोठं स्थान मिळवलं. हिंदी चित्रपटसृष्टीतील त्यांचं योगदान विसरता येणार नाही.
श्याम बेनेगल यांचा पहिला चित्रपट - श्याम बेनेगल यांनी 1974 मध्ये त्यांच्या चित्रपट दिग्दर्शनाची सुरुवात केली. 'अंकुर' नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला, जो त्यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला पहिला चित्रपट होता. 1986 मध्ये त्यांनी टीव्हीच्या दुनियेतही प्रवेश केला. त्यांनी स्वतःची ‘यात्रा’ ही मालिका दिग्दर्शित केली.
चित्रपटांच्या दुनियेत येण्यापूर्वी त्यांनी अर्थशास्त्राचा अभ्यास केला, पण नंतर त्यांनी फोटोग्राफीला सुरुवात केली. बॉलीवूडच्या दुनियेत त्यांना कलात्म चित्रपटाचे जनक देखील मानलं जातं. १९७६ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार तर १९९१ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. मंथन, अंकुर, मंदी, नेताजी सुभाष चंद्र बोस, जुबैदा, सरदारी बेगम, वेलडन अब्बा अशा अनेक प्रसिध्द चित्रपटांचं दिग्दर्शन त्यांनी केलय.
Some of his actors with Shyam Benegal’s on his 90th birthday Mashallah pic.twitter.com/cnDrjAphf2
— Azmi Shabana (@AzmiShabana) December 15, 2024
१४ डिसेंबरला त्यांनी त्यांचे नातेवाईक आणि मित्रांसोबत त्यांचा वाढदिवस साजरा केला होता. त्यांच्या निधनानं चित्रपट सृष्टीमध्ये शोक व्यक्त केला जात आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह, कुलभूषण खरबंदा, शबाना आझमी आणि इतर उपस्थित होते. मोठ्या थाटामाटात तसंच उत्साहात हा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. हा त्यांचा शेवटचा वाढदिवस ठरला.
१४ डिसेंबर १९३४ ला हैदराबादमध्ये त्यांचा जन्म झाला होता. छायाचित्रकार असलेले त्यांचे वडील श्रीधर बेनेगल हे मूळचे कर्नाटकातील होते. त्यांनी श्याम बेनेगल यांना चित्रपटसृष्टीत येण्यासाठी प्रोत्साहन दिलं. वडिलांनी भेट दिलेल्या कॅमेऱ्याचा वापर करुन श्याम यांनी वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी त्यांची पहिली फिल्म तयार केली होती. पदवीसाठी त्यांनी हैदराबाद येथील उस्मानिया विद्यापीठात प्रवेश घेतला. तिथेच त्यांच्या चित्रपटसृष्टीतील प्रदीर्घ तसंच ठसा उमटवणाऱ्या कारकिर्दीला प्रारंभ झाला.
ज्येष्ठ चित्रपट निर्माते शेखर कपूर यांनी श्याम बेनेगल यांच्या निधनानिमित्त दुःख व्यक्त केलं. भारतीय सिनेमात त्यांनी नवा प्रवाह, नवी लाट आणली. त्यांचं चित्रपट सृष्टीतील योगदान नेहमीच स्मरणात राहील. भारतीय चित्रपटाच्या दिग्दर्शनात त्यांनी नवा बदल घडवला, शबाना आझमी, स्मिता पाटील यासारख्या अभिनेत्रींना त्यांनी स्टार बनवलं, अशा शब्दात त्यांनी बेनेगल यांना आदरांजली अर्पण केली.