चंद्रपूर : अमृतसर येथील पोलीस चौकीवर हँड ग्रेनेड फेकणारा (Grenade Attack) वॉन्टेड खलिस्तानवाद्याला चंद्रपूर येथून शिताफीनं पकडण्यात गुप्तचर यंत्रणेला यश आलंय. स्थानिक पोलीस आणि गुप्तचर यंत्रणेनं ही संयुक्त कारवाई केली. जसप्रीत सिंग (वय 20) (Jaspreet Singh) असं या खलिस्तानवाद्याचं नाव आहे. शुक्रवारी (10 जानेवारी) सकाळच्या सुमारास अत्यंत गुप्तपणे ही कारवाई करण्यात आली. यानंतर आरोपीला पंजाब पोलिसांच्या हवाली करण्यात आल्याची माहिती, जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी दिली.
लॉयड मेटल कंपनी परिसरात होता लपून : 2023 मध्ये अमृतसर येथील पोलीस चौकीवर हल्ला करण्याचा मास्टरमाईंड जसप्रीत सिंग असल्याची माहिती आहे. यात त्यानं पोलीस ठाण्यावर हँड ग्रेनेड फेकलं होतं. बाईक चोरी करुन त्या आतंकवादी कारवाईत वापर करण्यातही तो माहीर होता. अमली पदार्थांच्या धंद्यातही त्याचा सक्रिय सहभाग होता. यानंतर तो फरार झाला, तेव्हापासून पंजाब पोलीस त्याच्या मागावर होते. यापूर्वी तो मेघालय राज्यात गेल्याची माहिती होती. त्याच्या मोबाईल फोनवरुन गुप्तचर यंत्रणा त्याचा ठावठिकाणा घेत होती. अशातच सहा दिवसांपूर्वी तो महाराष्ट्रात दाखल झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. याबाबत केंद्रीय गुप्तचर यंत्रणेनं अलर्ट जारी केला. या दरम्यान जसप्रीत सिंग हा चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस इथं आला. इथल्या लॉयड मेटल या कंपनीनं काम सुरू केलं आहे. या परिसरात जसप्रीत अन्य ओळखीच्या व्यक्तीसोबत राहत होता. इथूनच गुप्तचर यंत्रणेच्या पथकानं त्याला उचललं, अशी माहिती पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी दिली.
क्रेन ऑपरेटर म्हणून प्रशिक्षित : जसप्रीत हा क्रेन चालक होता. लॉयड मेटल कंपनीनं ज्या कंपनीनं दुसऱ्या कंपनीला ट्रान्सपोर्टचं कंत्राट दिलं आहे. त्याच कंपनीत तो पूर्वी कामाला होता. याच कंपनीतील सहकाऱ्यांच्या ओळखीनं जसप्रीत हा घुग्गुसला आला.
पंजाब पोलिसांना आरोपी जसप्रीत सिंग हवा होता, त्यानुसार त्याला पकडण्यात स्थानिक पोलिसांनी सहकार्य केलं. त्याच्यावर पंजाबमध्ये गुन्हे दाखल आहेत. - मुमक्का सुदर्शन, जिल्हा पोलीस अधीक्षक
सुपर मार्केटमध्ये ओळख पटली : जसप्रीत सिंगचे फोटो आधीच जारी करण्यात आले. याच नावानं तो घुग्गुस इथं राहत होता. गुप्तचर यंत्रणा त्याच्यावर निगराणी ठेवून होते, मात्र हा तोच आरोपी आहे का याची शहानिशा होत नव्हती. गुरुवारी जसप्रीत हा इथल्या स्थानिक सुपर मार्केटमध्ये खरेदी करण्यासाठी आला. याच दिवशी हा तोच आतंकवादी असल्याची पुष्टी झाली आणि यानंतर त्याला अटक करण्यात आली.
नागपूर-चंद्रपूर गुप्तचर यंत्रणेची कारवाई : ओळख झाल्यावर केंद्रीय गुप्तचर यंत्रणेच्या नागपूर आणि चंद्रपूर इथल्या सहा जणांच्या पथकानं त्याला शिताफीनं अटक करण्यात आली. चंद्रपूर पोलिसांना देखील याबाबत सूचित करण्यात आलं.
पंजाब पोलिसांच्या हवाली : ही माहिती पंजाब पोलिसांना देण्यात आली. पंजाब पोलिसातील विषेश पथक त्वरित चंद्रपुरात दाखल झालं. दोन वाहनातून 8 अधिकारी इथं दाखल झाले. यानंतर स्थानिक प्रशासनाच्या समोर हजर केल्यावर पंजाब पोलीस त्याला अटक करुन घेऊन गेले.
पोलीस पडताळणी न करताच अनेक जण कामावर : चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यामुळं इथं काम करण्यासाठी परराज्यातून येणाऱ्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. यात काही गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांचाही समावेश असतो. बाहेरुन येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची पोलीस पडताळणी होणं गरजेचं आहे. संबंधित कंपनीला याची माहिती पोलीस विभागाला देणं अनिवार्य असते. असं असताना अनेक कंपन्या या नियमाकडं विशेष दुर्लक्ष करतात, असं चित्र आहे. पोलीस विभाग देखील याबाबत कठोर पाऊल उचलत नाही. गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहे. ज्या ठिकाणी असे उद्योग आहेत, त्याच परिसरात गुन्हेगारीचं प्रमाण देखील वाढत चाललं आहे. याबाबत पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
हेही वाचा -
- Jammu and Kashmir Police : साकिब शकील दार या आतंकवाद्याला सोपोर कुपवाडा रोडवरून जेरबंद; जम्मू-काश्मिर पोलिसांची कारवाई
- बोगस आयकार्ड तयार करून देणाऱ्याला हैदराबादमधून अटक, तोतया आयपीएस अधिकाऱ्याचा 'असा' होता नबाबी थाट
- बनावट नोटा प्रकरण : अमरावती पोलिसांची कराड तालुक्यात छापेमारी; शंभराच्या 'इतक्या' बनावट नोटा जप्त, दोघांना अटक