अमरावती : पूर्णा नदीच्या काठावर वसलेल्या देवांचा वाडा अशी ओळख असणाऱ्या 'देऊरवाडा' गावातील एका शेतात जमिनीच्या खाली महादेवाचं मंदिर (Mahadev Temple) सापडलं. शिवरात्रीच्या पर्वावर जमिनीतून मंदिर बाहेर आलं असल्यानं, देऊरवाडा गावासह जिल्ह्यातील भाविक शिवरात्रीच्या पर्वावर हे मंदिर पाहण्यासाठी आणि शिवलिंगाच्या दर्शनाला येत आहेत. पूर्णा नदीचा काठ हा पौराणिकदृष्ट्या महत्वाचा आहे.
असं सापडलं मंदिर : देऊरवाडा गावात अतिशय भव्य नृसिंह मंदिर आहे. नृसिंह मंदिराच्या मागे शेख अस्लम यांचं शेत अगदी पूर्णा नदीच्या तीरावर आहे. या शेतात जमिनीत मंदिर असल्याची माहिती अनेक वर्षांपासून ग्रामस्थांना होती. 1975-76 मध्ये गावातील काही मंडळींनी जमिनीखाली मंदिर शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते काम अर्धवटच सोडून देण्यात आलं. 2014 मध्ये पूर्णा नदीला मोठा पूर आला आणि या पुरामुळं असलम शेख यांच्या शेताचा काही भाग पाण्यात वाहून गेला. त्यावेळी शेतात अगदी नदीच्या काठावर असणाऱ्या भागात जमिनीतून एक दगडी ओटा बाहेर आला होता. तेव्हा याठिकाणी मंदिर असावं हे लक्षात आलं होतं. मात्र, गावातील कुणीही याठिकाणी खोदकाम करावं यासाठी पुढाकार घेतला नाही. आता गावातील काही तरुणांनी नदीकाठी शेतात असणाऱ्या ओट्याजवळ खोदकाम करण्याचा निर्णय घेतला, असं मंगेश दाडे यांनी "ईटीव्ही भारत"शी बोलताना सांगितलं.
युवकांनी केलं खोदकाम : शेतात असणाऱ्या दगडी ओट्याच्या परिसरात खोदकाम करण्याचा निर्णय काही ग्रामस्थानी घेतला असता, शेतमालक शेख अस्लम यांनीही या कामास परवानगी दिली. ग्रामपंचायतीची या कामासाठी परवानगी घेतल्यावर तहसीलदार आणि पोलिसांना याबाबत माहिती दिली. 19 फेब्रुवारीला गावातील युवकांनी ओट्याच्या चारही बाजूनं खोदकाम करण्यास सुरुवात केली. जेसीबीच्या साहायानं चारही बाजूनं खोदण्यात आलं. या ओट्याच्या खाली सर्वात आधी एक दार दिसलं. यानंतर तरुणांनी कुदळ आणि फावडे घेऊन दाराच्या आतमध्ये खोदकाम केलं. यावेळी मोठ्या प्रमाणात दगडं बाहेर काढले. नदीतून वाहत आलेला सुकलेला गाळ बाहेर काढण्यात आला. यानंतर आतमध्ये शिवलिंग असल्याचं आढळलं असं देखील मंगेश दाडे यांनी सांगितलं.
मंदिरात शिवलिंगासह नर्तकीची मूर्ती : खोदकामात सापडलेल्या मंदिराच्या आतमध्ये खाली मध्यभागी शिवलिंग आढळलं. हे शिवलिंग दगडात घडवण्यात आलय. या शिवलिंगावर एकूण पाच थर असून वरचा थर हा जरा वेगळा भासणारा आहे. तर अशा स्वरूपाचं या भागात आढळलेलं हे एकमेव शिवलिंग आहे. मंदिरात नक्षीदार कोरीव काम असलेली नर्तकीची मूर्ती देखील आढळून आली. अशा स्वरूपाच्या मूर्ती मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ असतात असं ग्रामस्थ प्रदीप बेहरे यांनी सांगितलं.
भानूतीर्थ असा उल्लेख : देऊरवाडा हे ऐतिहासिक गाव असून गावच्या चारही बाजूंनी प्राचीन मंदिरं आहेत. हिरण्यकश्यपूचा वध केल्यावर नृसिंहानं अनेक नद्यामध्ये हात धुतला तरी त्याच्या वेदना कमी झाल्या नाहीत. अखेर त्यानं पयोष्णी अर्थात पूर्णा नदीत हात धुतले असताना त्याच्या वेदना थांबल्या. यामुळं नदीच्या काठावर नृसिंहांची स्वयंभू मूर्ती प्रकटली अशी अख्यायिका आहे. या ठिकाणी पांडवांनी देखील वास केला असा उल्लेख सापडतो. विशेष म्हणजे पयोष्णी पुराणात अध्याय क्रमांक 16 आणि ओवी क्रमांक एक मध्ये देऊरवाडा गावात आठ दिशेनं एकूण 18 तीर्थं अर्थात मंदिराचा उल्लेख येतो. यापैकी अकरा क्रमांकाचं तीर्थ हे भानू तीर्थ असून जमिनीत सापडलेलं हे मंदिर म्हणजेच भानू तीर्थ असल्याची माहिती, मंगेश दाडे यांनी दिली.
भाविकांची उसळली गर्दी : जमिनीखाली असलेलं मंदिर पाहण्यासाठी चार दिवसांपासून गावातील अनेक भाविकांची गर्दी होत आहे. मंदिरात एकावेळी एकच व्यक्ती जाऊ शकते आणि आतमध्ये मोठी जागा नसल्यानं मंदिरात भाविकांना जाता यावं म्हणून चर खोदण्यात आली आहे. मंदिरात येणाऱ्या प्रत्येकाला आतमध्ये शिवलिंगाचं दर्शन घेता यावं यातही गावातील युवकांनीच योग्य नियोजन केलंय. शिवरात्रीच्या पर्वावर पंचक्रोशीतील भाविकांनी पहाटेपासून मंदिरात गर्दी केली होती.
हेही वाचा -