शिर्डी : आगामी महापालिका निवडणुका शिवसेना (उबाठा) स्वबळावर लढवणार असल्याचं शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी सांगितलंय. यावर आता जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिलीय. ते शिर्डीत बोलत होते.
नेमकं काय म्हणाले राधाकृष्ण विखे पाटील? : यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, "विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाला जनतेनं नाकारलं. ते आता निवडणुका स्वतंत्र लढो किंवा एकमेकांच्या डोक्यावर बसून लढो, त्याची आम्हाला काहीच चिंता नाही." तसंच राज्यात जो विजय आम्हाला विधानसभेला मिळाला तोच विजय आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मिळेल, असा विश्वास देखील विखे पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
महाविकास आघाडी फार काळ टिकणार नाही : महाविकास आघाडीत सध्या सुरू असलेल्या मतभेदाबाबत बोलतांना विखे पाटील म्हणाले, "मी सुरुवाती पासूनच सांगतोय की महाविकास आघाडीत बिघाडी होण्यास वेळ लागणार नाही. त्यांची काय भूमिका आहे, काय तत्व आहे यासाठी हे एकत्र आले नव्हते. केवळ सत्तेत येण्यासाठी त्यांची धडपड होती. कोणी हिंदुत्व सोडलं तर कोणी आपल्या विचारधारेला फारकत दिली. त्यामुळं महाविकास आघाडी फार काळ टिकणार नाही. सत्ता गेल्यानं त्यांच्यातील मतभेत समोर येऊ लागलाय", अशी टीका त्यांनी केली. पुढं ते म्हणाले, "लोकसभेत जनतेला फसवण्याचा धंदा महाविकास आघाडीनं केला. 2019 ला जनतेचा महाआदर महायुतीला होता. मात्र, महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी भाजपाच्या पाठीत खंजीर खूपसला आणि लालसेपोटी सत्ता स्थापन केली. लोकसभेला निगेटिव्ह नरेटीव्ह वर महाविकास आघाडीनं विजय संपादन केला. मात्र, त्यांचा नरेटीव्ह विधानसभेला चालला नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
हेही वाचा -