मुंबई - गेल्या वर्षभरात अॅक्शन फिल्म्सना प्रेक्षकांनी भरुन दाद दिली आहे. 'अॅनिमल' चित्रपटात ज्या अवतारात रणबीर कपूर दिसला त्याला प्रेक्षकांनी पसंती दिली. अल्लू अर्जुनचा अॅक्शन ड्रामा असलेला 'पुष्पा 2' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर भरपूर गल्ला भरत आहे. या पार्श्वभूमीवर सोनू सूद नव्या अवतारात प्रेक्षकांसमोर येत आहे. त्याच्या 'फतेह' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झालाय. यामध्ये त्याची आक्रमकता पाहून 'अॅनिमल' आणि 'पुष्पा'तील वेगवान अॅक्शनची आठवण झाल्या शिवाय राहात नाही. सामान्य माणसांची अश्रू पुसण्यासाठी नेहमी आघाडीवर राहणारा सोनू सूद पडद्यावरही सामान्य लोकांसाठी एक मोठी लढाई लढताना या सिनेमात दिसणार आहे.
'फतेह'च्या ट्रेलरच्या सुरुवातीला नसिरुद्दीन शाहच्या आवाजानं होते. त्यामध्ये शाह म्हणतात, "तुम और हम एक ऐसे एजन्सी का हिस्सा थे जहाँ एक पहले फोटो आता था और बाद में कॉल. कभी नहीं पुछा किसे मारना है, क्यूँ मारना है, सही हो या गलत बस्स मारना था... " या नंतर रक्तरंजीत खुनखराबा सुरू असलेला दिसतो आणि आक्रमक सोनू सूद एन्ट्री करतो आणि आपल्या चपळाईनं एकेकाची धुलाई करतो.
या कथानकात जॅकलिन फर्नांडिस सोनू सूदला साथ देताना दिसत आहे. दोघे मिळून माफियाच्या मागे हात धुवून लागतात आणि सुरू होते वाईटांच्या विरोधातली एक लढाई. या चित्रपटात सोनू सूदबरोबर जॅकलीन फर्नांडिस, नसीरुद्दीन शाह, विजय राज, शिव ज्योती राजपूत, दिव्येंदू भट्टाचार्य, प्रकाश बेलवाडी, बिन्नू ढिल्लोन यासारख्या तगड्या कलाकारांची फौज आहे. पुढे ट्रेलरमध्ये सोनू सूद एकेकाला शोधून टिपताना दिसतो. सोनू सूद पहिल्यांदाच अशा आक्रमक भूमिकेत वेगवान अॅक्शन करताना दिसत आहे.
'फतेह' या चित्रपटातून सोनू सूद लेखन आणि दिग्दर्शनात हात आजमावणार आहे. हा त्याचा पहिलाच दिग्दर्शकीय चित्रपट आहे. या चित्रपटाची निर्मिती सोनाली सूद आणि सोनू सूद यांनी केली आहे. 'फतेह' हा चित्रपट 10 जानेवारी 2025 रोजी रुपेरी पडद्यावर रिलीज होणार आहे.