छत्रपती संभाजीनगर : जायकवाडी धरणाच्या हक्काच्या पाणी प्रश्नावर मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींना एकत्र आणण्यासाठी औद्योगिक संघटना असलेल्या 'मसीआ' संघटनेच्या माध्यमातून 'जल समृद्धी प्रतिष्ठान'तर्फे चर्चा सत्र आयोजित करण्यात आलं होतं. पाण्याच्या प्रश्नासाठी लोकप्रतिनिधी एकत्र येऊन काम करणार असल्याचा विश्वास मंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त केला. "राधाकृष्ण विखे पाटील असो किंवा अजून कुठले नेते, त्यांना विनंती आहे की, तुम्ही महाराष्ट्राचं नेतृत्व करत आहात, एका भागाचं नाही. आमची जर अवांतर मागणी असेल तर तुम्ही विरोध करा. परंतु हक्काच्या मागणीला जर तुम्ही विरोध करत असाल तर आम्हाला तुमचा विरोध करावा लागेल," असा इशारा संजय शिरसाठ यांनी दिला.
हक्काचं पाणी मिळवण्यासाठी परिषद : जायकवाडी धरणात नगर आणि नाशिक धरणामधून हक्काचं पाणी मिळवण्यासाठी आजही लढा द्यावा लागतो. आगामी पावसाळ्यात उपयुक्त जलसाठा मिळावा यासाठी लोकप्रतिनिधींना एकत्र आणून सरकार दरबारी आपलं म्हणणं मांडण्यासाठी परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. "मराठवाड्यासाठी पाणी दिवसेंदिवस महत्त्वाचं आहे. विदर्भात 71 टक्के पाणी अतिरिक्त आहे, त्यातील 34 टक्के दिलं तर परभणी, हिंगोली, नांदेड या ठिकाणचा पाणी प्रश्न मिटेल. तर परभणी, लातूर, बीड जिल्ह्यासाठी कृष्णा खोऱयातून पाणी अपेक्षित आहे. कोकणातून 155 टीएमसी पाण्याची मागणी केली. मात्र, त्यावर फक्त चर्चा होते, पाणी सोडलं जात नाही," अशी माहिती पाणी अभ्यासक डॉ शंकरराव नागरे यांनी दिली.
पाणी प्रश्नासाठी आक्रमक होणार : "मराठवाड्याच्या पाण्याचा प्रश्न अनेक वर्षापासून सुरू आहे. जे हक्काचं आहे, ज्याच्यासाठी अनेक लोक न्यायालयात गेले. तो निकाल देखील आमच्या बाजूने लागला, तरी पाण्याची मागणी करावी लागते हे आमचं दुर्दैव आहे. काही लोक मराठवाड्याला पाणी मिळू नये म्हणून वेठीस धरत आहेत. त्यांच्यामुळं हा प्रश्न चिघळत चालला आहे. मराठवाड्यात भविष्यात अजून 11 टक्के पाणी कमी कसं दिलं जाईल असा प्रयत्न सुरू आहे. लोकसंख्या वाढत चालली आहे. त्यामुळं पाणी वाढायला पाहिजे, पण ते अजून कमी होत चाललं आहे. हे पाणी जर अजून कमी झालं तर मराठवाडा हा वाळवंटाचा प्रदेश म्हणून ओळखला जाईल. त्यामुळं आमची मागणी आहे की, हक्काचं पाणी मिळालं पाहिजे," अशी भूमिका मंत्री संजय शिरसाठ यांनी मांडली.
पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांना दिला इशारा : "मराठवाड्याला हक्काचं पाणी देताना कुचराई करू नका, विखे पाटील असो किंवा अजून कुठले नेते, त्यांना विनंती आहे की, तुम्ही महाराष्ट्राचं नेतृत्व करत आहात, कुठल्या एका भागाचं नाही. जर तुम्ही हक्काच्या मागणीला विरोध करत असाल तर आम्हाला तुमचा विरोध करावा लागेल," असा इशारा मंत्री संजय शिरसाट यांनी पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांना दिला. तर नेहमी पाणी प्रश्नावर बोलणारे आमदार प्रशांत बंब यांनी पाण्याबाबत आजपर्यंतच्या लढाईची माहिती दिली. मराठवाड्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन या प्रश्नावर बोललं पाहिजे, अशी अपेक्षा उपस्थित असलेल्या अभ्यासकांनी व्यक्त केली.
हेही वाचा -
- "भाजपाला अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद मान्य होतं पण,..."; संजय राऊतांच्या 'त्या' दाव्यानंतर संजय शिरसाट यांचा मोठा गौप्यस्फोट - Sanjay Shirsat
- संभाजीनगरचा उमेदवार आजच जाहीर करण्याची संजय शिरसाठ यांची मुख्यमंत्र्यांकडं मागणी - Lok Sabha Election 2024
- उद्धव ठाकरेंनी पक्षात इतरांवर अन्याय केला, मंत्री दीपक केसरकरांची टीका