सिंधुदुर्ग : सुमारे साडेचारशे वर्षांची गौरवशाली ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या सावंतवाडी तालुक्यातील माजगाव म्हालटकरवाडा येथील प्रसिद्ध सात दिवसांच्या धालोत्सवाची (Dhalotsav) सांगता शुक्रवारी दुपारी उत्साहात झाली. या धालोत्सवाची वैशिष्ट्यपूर्ण आणि आगळीवेगळी गुरूवारची सातवी रात्र मनोरंजनासह यादगार ठरली.
काय आहे प्रथा? : या प्रसिद्ध धालोत्सवाच्या पहिल्या दिवशी लागणारी परडी समई, फुले, तांब्याची घागर, पान, विडे घेऊन महिला महादेव देवस्थान येथील मांडावर एकत्र आल्या आणि त्यानंतर गाऱ्हाणे घातल्या. यावेळी तुळशी वृंदावनाला हळद, पिंजर, फुले वाहून पूजा करण्यात आली. या उत्सवाला विधिवत थाटात प्रारंभ झाल्यानंतर स्त्रिया मांडावर देवीसमोर फेर धरून नाचल्या. त्यानंतर या उत्सवाच्या पाचही दिवस स्त्रिया दोन्ही बाजूला समांतर रेषेत उभे राहून ओव्या आणि गीत म्हणतात. या उत्सवाची सहावी बुधवारची रात्र कासार मामाच्या बांगड्या भरण्याच्या आणि शेकोटीचा आणि गप्पाटप्पाच्या कार्यक्रमाची झाली.
धालोत्सवाचा सांगता सोहळा : धालोत्सवातील इतर रात्रीपेक्षा सातवी रात्र खास आकर्षण तसेच वैशिष्ट्यपूर्ण आणि आगळीवेगळी असल्यामुळं ती रात्रभर जागविण्यात आली. रात्री नाचणाऱ्या स्त्रियांमधील दोघीजणी पती-पत्नीची वेशभूषा केली. यावेळी त्यांची वाजतगाजत वरात काढली. नवरा देवघरातून सुटून लग्नासाठी वाड्यातून वरातीसह येतो आणि तुळशीकडं येऊन दानोशीला बसतो. यावेळी महिलांनी म्हटलेले 'रुकवात करतले गे सुंदरी, घेडे बैसले बरोबरी! अशे थेडे उतावळी, लाडू उचलेले वरचेवरी!! हे गीत लक्षवेधी ठरले. यानंतर तिथून नवरा मांडाकडे येतो. त्यानंतर मंगलाष्टके म्हणून हा लग्न सोहळा थाटात पार पडतो. या सोहळ्याला माजगाव परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी रात्रभर फुगड्या, गाणी, नाच असा सकाळी सहापर्यंत हा कार्यक्रम पार पडला. अशाप्रकारे सात दिवसाच्या गजबजलेल्या रात्रीची सांगता झाली.
ओव्यातून महत्व विषद केलं : धालोत्सवाच्या सांगता सोहळ्याला शुक्रवारी सकाळी स्त्रिया शुचिर्भूत होऊन मांडावर आल्यानंतर नवस बोलण्याचा कार्यक्रम झाला. यावेळी मांडावरील शेणाच्या तुळशीत हळद आणि दुधाचे मिश्रण ओतले जाते. यावेळी महिलांनी म्हटलेल्या 'शेण कालयता, शेण कालयता, शेणात पडले किडे गे ते! शेणात पडले किडे गे.' या ओव्यातून या प्रसंगाचे महत्व विषद केले. त्यानंतर स्त्रियांचा ओट्या भरण्याचा कार्यक्रम झाला. त्यानंतर धालोत्सवातील तुळशीची परडी पुन्हा देवघरात आणण्यात आली. या सातही दिवस वाड्यातील सर्व मंडळी उत्साहीत असतात. या धालोत्सवातून लोककला टिकवण्यासह त्याचा प्रसारही करण्याचं कार्य मोठ्याप्रमाणात होतं.
हेही वाचा -
'वसंत पंचमी' दिनी विठ्ठल-रुक्मिणीचा शाही विवाह सोहळा; पाहा व्हिडिओ