कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यासह बाहेरून येणाऱ्या गोरगरीब रुग्णांचा आधारवड असलेल्या 'थोरला दवाखाना' अर्थात छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (सीपीआर) ला नवसंजीवनी देणारं काम तत्कालीन आरोग्य मंत्री दिग्विजय खानविलकर यांनी केलं होतं. आता 25 वर्षानंतर कोल्हापूरला राधानगरीचे आमदार प्रकाश आबिटकर यांच्या रुपानं पुन्हा एकदा ही संधी मिळाली आहे. जिल्हा रुग्णालय असलेल्या सीपीआरला समस्येच्या विळख्यातून बाहेर काढण्याचं आव्हान आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासमोर असणार आहे.
पुन्हा कॅबिनेट मंत्री होण्याचा बहुमान : राज्य विधानसभेच्या निवडणुकीत निर्विवाद सत्ता मिळवलेल्या महायुतीला कोल्हापूर जिल्ह्यातही मोठी ताकद मिळाली आहे. जिल्ह्यातील दहा विधानसभा जागांपैकी दहा ही जागा महायुतीच्या उमेदवारांनी जिंकल्या. यामुळं कोल्हापूर जिल्ह्याचं राज्यात पुन्हा एकदा महत्त्व निर्माण झालं आहे. 'सहकाराचं हब' असलेल्या कोल्हापूर जिल्ह्याला राष्ट्रवादीकडून (अजित पवार) एक आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून एक अशी दोन कॅबिनेट मंत्रिपदे जिल्ह्याला मिळाली आहेत. यापैकी कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांना पुन्हा एकदा वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी मिळाली आहे. तर दुर्गम भाग समजल्या जाणाऱ्या राधानगरी-भुदरगड विधानसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा निवडून आलेल्या प्रकाश आबिटकर यांना पहिल्याच दणक्यात कॅबिनेट मंत्री होण्याचा बहुमान मिळाला आहे.
आरोग्य सांभाळण्याची मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या खांद्यावर : यापूर्वी कोल्हापूर जिल्ह्याला शरद पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तत्कालीन करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिग्विजय खानविलकर यांच्या रुपानं आरोग्य मंत्रिपद मिळालं होतं. 1999 ते 2004 या कालावधीत खानविलकर यांनी आरोग्य मंत्री पदाच्या कालावधीत केलेलं उत्कृष्ट काम आजही कोल्हापूरकरांच्या मनात घर करून बसलं आहे. जिल्हा रुग्णालय असलेल्या छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या उभारणीसाठी मोठं योगदान खानविलकर यांचं आहे. तसंच कोल्हापूरला पहिलं वैद्यकीय महाविद्यालय आणण्याचं श्रेयही खानविलकर यांना जातं. यामुळं यंदाच्या मंत्रिमंडळात प्रकाश अबिटकर यांना मिळालेल्या सार्वजनिक आरोग्य खात्याच्या माध्यमातून राज्यासह कोल्हापूरकरांचं आरोग्य सांभाळण्याची धुरा आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या खांद्यावर असणार आहे.
आरोग्य संबंधी दोन्ही खाती कोल्हापूरकडं : राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्रालय आणि सार्वजनिक आरोग्य मंत्रालयाची जबाबदारी कोल्हापूरच्या दोन्ही आमदारांवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी दिली आहे. आरोग्यासंबंधी दोन्ही खाती कोल्हापूरच्या मंत्र्यांकडं असल्यामुळं कोल्हापूरचं आणि प्रामुख्यानं राज्याचं आरोग्य सांभाळण्यासाठी दोन्ही मंत्र्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
'ही' असणार आहेत मंत्र्यांसमोरील आव्हानं : कोल्हापूरच्या गोरगरीब रुग्णांचा आधारवड असलेलं सीपीआर रुग्णालय समस्यांच्या विळख्यात सापडलं आहे. अनेक क्लिष्ट रोगांचं निदान करण्यासाठी या रुग्णालयात अत्याधुनिक एम.आर.आय. मशीनची आवश्यकता आहे. कोकण, कर्नाटक या भागातून येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यानं, दाखल असलेल्या रुग्णांना औषधांचा पुरवठाही वेळेवर होत नसल्याच्या तक्रारी आहेत. तसंच वारंवार मागणी करूनही सुविधा या रुग्णालयाला मिळालेल्या नाहीत. तर रुग्णसंख्या वाढल्यानं रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागाचं विस्तारीकरण होणं गरजेचं आहे.
थोरला दवाखाना लोकाभिमुख करण्याचं आव्हान : सीपीआर रुग्णालयात मोठ्या प्रमाणात प्रसूती होत असल्यामुळं या विभागाची आता असलेली इमारत अपुरी पडत आहे. त्यामुळं रुग्णालयात प्रसुतीसाठी येणाऱ्या महिलांची संख्या अधिक असल्यानं हा विभाग सुसज्ज होणं गरजेचं आहे. शाहूकालीन छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाची इमारत हेरिटेज वास्तू असल्यामुळं सीपीआर हॉस्पिटल समोरील अनधिकृत टपऱ्या काढणं गरजेचं आहे. मात्र याला राजकीय वरदहस्त असल्यानं या कामावर मर्यादा येत आहेत. परिणामी हेरिटेज वास्तू दिवसेंदिवस कुरूप बनत चालली आहे. रुग्णालय परिसरातील अंतर्गत रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. रुग्णांच्या नातेवाईकांसह अधिकारी, कर्मचाऱ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयाला समस्यांच्या गर्तेतून बाहेर काढून सर्वसामान्यांचा थोरला दवाखाना अधिकाधिक लोकाभिमुख करण्याचं आव्हान प्रकाश आबिटकर यांच्यासमोरआहे.
हेही वाचा -