कोलकाता Underwater Metro : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोलकाता इथं पाण्याखालील मेट्रो रेल्वे सेवेचं उद्घाटन केलंय. यासह, पंतप्रधानांनी 15400 कोटी रुपयांच्या मेट्रो संबंधित अनेक प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. यावेळी पंतप्रधान मोदी मेट्रोतून प्रवासाही करणार आहेत. ही मेट्रो हावडा मैदान ते एस्प्लेनेड दरम्यान धावते. या बोगद्यामुळे ट्रेन्स हुगळी नदीच्या तळापासून 32 मीटर खाली धावू शकेल, ज्यामुळं प्रवाशांचा प्रवास वेळ कमी होईल.
पहिली 'अंडरवॉटर मेट्रो' : पूर्व-पश्चिम मेट्रो कॉरिडॉरचा एक भाग म्हणून, देशातील पहिली 'अंडरवॉटर मेट्रो' ट्रेन हावडा आणि एस्प्लेनेड दरम्यान धावेल. या बोगद्यांमध्ये निळ्या दिव्यांनी प्रवाशांचं स्वागत केले जाईल. मेट्रो अधिकाऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या नोंदीनुसार, 1921 मध्ये हावडा आणि कोलकात्याला ट्यूब रेल्वे सेवेद्वारे जोडण्याची कल्पना ब्रिटिशांनीच मांडली होती. पण, अखेर ती योजना रद्द झाली. मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्टची कल्पना 1969 मध्ये झाली होती. बराच विचारविनिमय केल्यानंतर कोलकाताचं मेट्रो नेटवर्क तयार करण्यासाठी पाच वेगवेगळ्या मार्गांचा निर्णय घेण्यात आला. चार मार्गांपैकी पहिला मार्ग उत्तर-दक्षिण कॉरिडॉर होता. हा मार्ग आज उत्तरेकडील दक्षिणेश्वर ते दक्षिणेकडील न्यू गारियापर्यंत पसरलेला आहे. याचे एकूण अंतर सुमारे 33 किलोमीटर आहे. पूर्व-पश्चिम मेट्रो कॉरिडॉर केंद्रातील यूपीए सरकारनं 2008 मध्ये पुढे नेला. त्यानंतर 2009 मध्ये त्याची पायाभरणी झाली होती.
पूर्व-पश्चिम मेट्रो कॉरिडॉर : या कॉरिडॉरचा नवीन मार्ग सॉल्ट लेक सेक्टर V आणि हावडा मैदान दरम्यानच्या अंदाजे 16.55 किलोमीटर अंतरासाठी तयार करण्यात आला होता. हुगळी नदी ओलांडून कोलकाता आणि हावडा जोडण्याचा हा पहिला मोठा प्रयत्न होता. या मार्गाचा पहिला टप्पा सॉल्ट लेक सेक्टर V ते सियालदहपर्यंत आधीच सेवेत आहे. सियालदह रेल्वे स्टेशन हे देशातील सर्वाधिक गर्दी असणाऱ्या टर्मिनल रेल्वे स्थानकांपैकी एक आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी या मार्गावर स्क्रीन डोअरसह दळणवळण आधारित ट्रेन कंट्रोल सिग्नलिंग सिस्टिमसह अत्याधुनिक आणि सुरक्षित तंत्रज्ञान बसवण्यात आलंय.