अहिल्यानगर- शिर्डी जवळील पोहेगाव येथील माळवे सराफाच्या सोन्याच्या दुकानात सोमवारी सायंकाळी सहा वाजता दरोडा पडला. यावेळी चोरट्यांनी दुकान मालकासह मुलावर धारदार शस्त्रांनी हल्ला केल्यानं दोघे गंभीर जखमी ( Shirdi crime news ) झाले. सुदैवानं नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळलाय.
दुचाकीवरून आलेल्या तीन जणांनी कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील माळवे सराफा दुकानावर दरोडा टाकला. सराफा व्यवसायिक माळवे यांना धारदार शस्रांचा धाक दाखवत सोन्याचं दुकान लुटलं. सराफा व्यवसायिकानं आरडाओरडा केल्यानंतर चोरट्यांनी माळवे यांच्यासह त्यांच्या मुलावर धारदार शस्त्रानं हल्ला केला. या हल्ल्यात सराफा व्यवसायिक माळवे यांच्यासह त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दोघांवर प्राणघातक हल्ला करून लुटलेला ऐवज घेऊन चोरटे फरार होत असताना आजूबाजूला असलेल्या दुकानदारांसह काही ग्रामस्थांनी सतर्कता दाखविली. त्यामुळे लुटलेला ऐवज चोरट्यांनी तिथेच सोडून फरार होण्याचा प्रयत्न केला. यावेळी गावातील ग्रामस्थांनी दोन चोरट्यांना पकडलं. संतापलेल्या ग्रामस्थांनी चोरट्यांना चांगलाच चोप दिला. मात्र, एक आरोपी ग्रामस्थांच्या तावडीतून फरार जाण्यात यशस्वी झाला. ग्रामस्थांच्या मारहाणीत जखमी झालेल्या दोन आरोपींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी बाळासाहेब पवार यांनी दिली.
''सराफानं एका चोरट्याला पकडून ठेवलं होतं. दुसरे चोरटे त्याला सोडविण्याचा प्रयत्न करत होते. चोरट्यांच्या हातात कोयता, सुरा अशी हत्यारे होती. त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा चोरट्यांनी कोयता फिरविला. लोकांनी पकडण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांनी पळ काढला" - बाळासाहेब पवार, प्रत्यक्षदर्शी
- माळवे सोन्याच्या दुकानात जबरी चोरी झाल्याची माहिती शिर्डी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करून गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती शिर्डी पोलीस उपविभागीय अधिकारी शिरीष वामने यांनी दिली आहे.
हेही वाचा-