अमरावती : जादूटोण्याच्या संशयातून वृद्ध महिलेला बेदम मारहाण करुन गावातून धिंड काढण्यात आल्यानं मोठी खळबळ उडाली. ही घटना चिखलदरा तालुक्यातील रेट्याखेडा या गावात 30 डिसेंबरला घडली. या प्रकरणी पीडितेच्या मुलानं दाखल केलेल्या तक्रारीवरुन पोलीस पाटील आणि इतर नराधमांविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली. या प्रकरणी आरोपी पोलीस पाटील बाबू झापू जामुनकर याला पदावरुन बडतर्फ करण्यात आलं. यासंदर्भात सहायक जिल्हाधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर यांनी मंगळवारी आदेश काढले आहेत.
महिलेला मारहाण करुन गळ्यात चपलांचा हार घालून काढली धिंड : पीडित 77 वर्षीय महिलेला जादूटोण्याच्या संशयावरून बेदम मारहाण करत तिचे हातपाय बांधण्यात आले. तिच्या गळ्यात चपलांचा हार घालून तिच्या चेहऱ्याला काळे फासण्यात आलं. त्यानंतर या पीडितेची गावातून धिंड काढण्यात आली. नराधमांनी तिला गावाबाहेर काढलं. ही बाब पोलिसांच्या अहवालात निष्पन्न झाल्यानं या गुन्ह्यात कलम 118 (2), 119 (2), 127 (2) भारतीय न्याय संहिता सहकलम 3 (2) महाराष्ट्र जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम समाविष्ट करून आरोपींना 19 जानेवारीला अटक करण्यात आली. महिलेला बेदम मारहाण करुन तिला काळं फासून गावात धिंड काढण्यात आल्यानं पीडितेच्या कुटुंबीयांना जबर धक्का बसला. त्यामुळे पीडितेच्या मुलानं याबाबत तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे चिखलदरा इथले तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकांनी अहवाल सादर केला. त्या अहवालानुसार आरोपी पोलीस पाटील बाबू झापू जामुनकर आणि इतर चार आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
असा आहे आदेश : बाबू जामुनकर यानं सादर केलेल्या खुलास्यात त्याच्यावरील आरोप नाकारले नाहीत. बाबू जामुनकर यानं गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडवून आणून पोलीस पाटील पदाची प्रतिष्ठा मलीन केली आहे. त्यानं केलेलं गैरकृत्य हे पोलीस पाटील पदाला न शोभणारे आणि अत्यंत गंभीर स्वरूपाचं आहे. त्यामुळे त्याला पदावरून बडतर्फ करण्यात येत आहे, असं आदेशात नमूद करण्यात आलं आहे.
काय आहे महिलेला मारहाण आणि धिंड काढल्याचं प्रकरण : रेट्याखेडा गावात 30 डिसेंबर रोजी मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली. वृद्ध महिला घरी एकटीच होती. तिचा मुलगा आणि सून रोजगारासाठी बाहेरगावी होते. यावेळी महिलेला नराधमांनी जादूटोणा करत असल्याच्या संशयातून बेदम मारहाण केली. या महिलेच्या तोंडाला काळं फासून तिच्या गळ्यात चपलांचा हार टाकण्यात आला. त्यानंतर या महिलेची गावात धिंड काढण्यात आली. या प्रकारानं मोठी खळबळ उडाली. महिलेच्या मुलाला आणि सूनेला ही घटना कळल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. पण, सुरूवातीला पोलिसांनी केवळ मारहाणीचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणात न्याय मिळावा, या मागणीसाठी पीडित महिलेसह मुलगा आणि सून यांना जिल्हाधिकारी कार्यालय गाठावं लागलं. पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणात कठोर कारवाईचे निर्देश दिलेत. त्यानंतर पोलीस निरीक्षक आणि तहसीलदारांनी अहवाल दिल्यानंतर या घटनेला वाचा फुटली.
हेही वाचा :
- मृतदेहावर जादूटोणा करण्याच्या बहाण्यानं महिलेला पावणे नऊ लाखांचा गंडा, पोलिसांकडून मांत्रिकाला अटक
- स्मशानातील भोंदू बाबाच्या जादूटोण्याचा डाव गावकऱ्यांनी उधळला; भोंदू बाबाला ठोकल्या पोलिसांनी बेड्या - Bhondu Baba Arrested
- Black Magic In Pune : जादूटोण्यासाठी मासिक पाळीतील रक्त विकले मांत्रिकाला; महिला आयोगाकडून दखल