वाशीम : कारंजा-पोहा मार्गावरील तुळजापूर गावाजवळ मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास दोन ऑटोरिक्षा आणि पिकअप वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात एका महिलेसह तीन जणांचा मृत्यू झाला. तर, आठ जण गंभीर जखमी झाले. शालिनी उत्तम लोखंडे (३५ वर्षे, रा. बेलमंडळ), नीलेश रमेश वनावसरे (२५ वर्षे, रा. पोहा) आणि मारुती पिराजी शिंदे (७० वर्षे, रा. मोहळ) अशी अपघातातील मृतांची नावं आहेत.
विचित्र अपघातात तीन ठार : मिळालेल्या माहितीनुसार, एमएच ३७ टी ३६४१ क्रमांकाचं पीकअप वाहन भरधाव वेगात पोहा इथून कारंजाच्या दिशेनं जात होतं. या वाहनानं विरुद्ध दिशेनं येणाऱ्या प्रवासी ऑटोरिक्षाला जोरदार धडक दिली. त्याचवेळी प्रवासी ऑटो रिक्षाच्या मागून येत असलेल्या मालवाहू ऑटोलाही पीकअपची जोरदार धडक बसली. या अपघातात तीन जण ठार झाले. तर, इतर आठ जण जखमी झाले. त्यापैकी आसिफ खान कलीम खान (३८ वर्षे, रा. पोहा), इमरान पठाण (४० वर्षे, रा. दीपक चौक, अकोला) आणि शाहीद नाजीम खान (१३ वर्षे, रा. करीमनगर कारंजा) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्याशिवाय निर्मला ज्ञानेश्वर मानकर (६० वर्षे), फौजिया परवीन आसिफ पठाण (२७ वर्षे), अशोक महादेव नितनवरे (३२ वर्षे), मेघा अशोक नितनवरे (२८ वर्षे)( सर्व रा. पोहा) आणि पंचफुला पाचंगे (६५ वर्षे, रा. मोहगव्हाण) हे पाच जण किरकोळ जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच सर्वधर्म आपत्कालीन संस्था आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी जखमींना उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं. सर्व जखमींवर उपचार करण्यात आले असून, गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी अकोल्याला पाठवण्यात आलं आहे.
हेही वाचा :