नवी दिल्लीNEET Paper Leak Case :NEET पेपर लीक प्रकरणातील वादानंतर केंद्र सरकारनं मोठी कारवाई केली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) चे महासंचालक (DG) सुबोध कुमार यांना पदावरून हटवण्यात आलं आहे. त्यांच्या जागी निवृत्त आयएएस प्रदीप सिंह खरोला यांना एनटीएचे महासंचालक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. प्रदीप सिंह खरोला हे कर्नाटक कॅडरचे माजी आयएएस अधिकारी आहेत. नुकत्याच झालेल्या NEET पेपर लीक तसंच UGC-NET परीक्षा पेपर फुटीप्रकणात NTA वर सातत्यानं प्रश्न उपस्थित केलं जात आहेत. आता याप्रकरणी मोठी कारवाई करत सरकारनं सुबोध कुमार यांना डीजी पदावरून हटवलं आहे.केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी सांगितलं की, नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA)च्या नीट परिक्षेतील गैरव्यव्हराची चौकशी सुरू आहे.
NEET प्रश्नपत्रिका व्हॉट्सॲपवर :NEET पेपर लीक प्रकरणी पाटणा पोलिसांनी झारखंडच्या देवघर जिल्ह्यातून सहा आरोपींना ताब्यात घेतलं आहे. देवघरच्या देवीपूर पोलीसांच्या मदतीनं पाटणा पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. या सहा आरोपींमध्ये चिंटू उर्फ बलदेव यांचाही समावेश आहे. ज्याच्या मोबाईलवर 5 मे रोजी सकाळी 9.30 वाजता प्रश्नपत्रिका, उत्तरे व्हॉट्सॲपवर शेअर करण्यात आली होती.
पेपर लीक प्रकरणात झारखंडमधून 6 जणांना अटक :पाटणा पोलिसांनी पंकू कुमार, परमजीत सिंग, चिंटू उर्फ बलदेव कुमार, काजू उर्फ प्रशांत कुमार, अजित कुमार आणि राजीव कुमार यांना ताब्यात घेतलं आहे. पाटणा पोलीस त्याला देवघरहून पाटण्याला घेऊन जाणार आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा आर्थिक गुन्हे विभाग तपास करत आहे. अन्य आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पोलीस ठिकठिकाणी छापे टाकत आहेत. या छाप्यात देवघर येथून 6 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे.