नवी दिल्ली- कोविड-19 महामारीच्या पाच वर्षांनंतर चीनमध्ये ( HMPV outbreak in China) आलेल्या ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस (HMPV) या विषाणुमुळे जगभराची चिंता वाढविली आहे. असे असले तरी भारतीयांनी चिंता करू नये, असे आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.
मीडिया रिपोर्ट आणि सोशल मीडियानुसार एचएमपीव्ही हा विषाणू चीनमध्ये वेगानं पसरत आहे. त्यामुळे रुग्णालयासह स्मशानभूमीत गर्दी वाढत आहे. मीडियातील रिपोर्टनुसार या विषाणुणुळे अचानक मृत्यूचे चिंताजनक प्रमाण वाढले. मृत्यूमध्ये 40 ते 80 वयोगटातील लोकांचे अधिक प्रमाण आहे.
चीनमध्ये कशी स्थिती आहे?SARS-CoV-2 (COVID-19) हँडल असलेल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एका पोस्टमध्ये म्हटले,, “चीनमध्ये इन्फ्लूएंझा ए, एचएमपीव्ही, मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया आणि कोविड-19 यासह अनेक विषाणूंच्या रुग्णांचं प्रमाण वाढल आहे. त्यामुळे रुग्णालयात ताण वाढला आहे. मुलांमध्ये न्यूमोनियाचे प्रमाणदेखील वाढत आहे. चीनच्या सरकारी माध्यमानं दिलेल्या माहितीनुसार 14 वर्षे आणि त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांसह वृद्ध आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या लोकांमध्ये एचएमपीव्हीचे प्रमाण कमालीचं वाढलेलं आहे.
सरकारकडून काय घेण्यात येत आहे काळजी- चीनमध्ये विषाणू पसरल्याच्या वृत्ताबाबत भारतीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं, " शेजारच्या देशात पसरणारा विषाणू हा सामान्य खोकला, सर्दी आणि इतर कोणत्याही इतर विषाणूंसारखा आहे. हा नवीन साथीचा रोग नाही. लोकांना घाबरण्याची किंवा काळजी करण्यासारखं काही नाही. खबरदारीचा उपाय म्हणून, HMPV प्रकरणांची चाचणी करणाऱ्या प्रयोगशाळांची संख्या वाढविण्यात आल्या आहेत. जागतिक आरोग्य संघटनेलादेखील (WHO) चीनमधील परिस्थितीबद्दल वेळेवर माहिती कळविण्याची विनंती केल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. आरोग्य संचालनालयाचे डॉ. अतुल गोयल यांनी म्हटलं, " थंडीच्या वातावरणात श्वसनाचे संसर्ग सामान्यपणे होतात. अशा परिस्थितीत नियमित खबरदारी घ्यावी. आवश्यक असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. रोगाच्या लक्षणांनुसार वैद्यकीय उपचार घ्यावेत".
आरोग्याची कशी काळजी घ्यावी?
- कमीत कमी 20 सेकंद साबणाने वारंवार हात धुवा
- हात धुतल्याशिवाय हातांनी डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करू नका.
- संक्रमित लोकांपासून दूर रहा.
- सर्दी-खोकल्याचा त्रास असणाऱ्यांनी मास्क वापरावे.
- खोकताना, शिंकताना तोंड आणि नाक झाकावे.
- विषाणूची लागण झालेल्या लोकांनी घराबाहेर पडू नये.
कोणतीही लस उपलब्ध नाही- यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) नुसार, एचएमपीव्हीच्या आजारामध्ये खोकला, ताप, नाक बंद होणे आणि श्वास घेण्यास त्रास होतो. हस्तांदोलन आणि व्हायरसने दूषित वस्तूला स्पर्श केल्यानं या रोगाचा संसर्ग होऊ शकतो. सध्या यावर कोणतीही लस उपलब्ध नाही. यापूर्वी 2023 मध्ये, एचएमपीव्हीचे रुग्ण नेदरलँड, यूके, फिनलंड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, अमेरिका आणि चीनमध्ये आढळून आले होते.