नवी दिल्ली: संविधानाला 'सुरक्षा कवच' म्हणत, काँग्रेस नेत्या आणि वायनाडच्या खासदार प्रियंका गांधी यांनी शुक्रवारी लोकसभेतील आपल्या पहिल्या भाषणात सत्ताधारी सरकारवर हल्ला चढवला. गेल्या 10 वर्षांपासून केंद्र सरकारनं 'कवच' (ढाल) तोडण्याचे सर्व प्रयत्न केले आहेत असं त्या म्हणाल्या.
भारतीय संविधानाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या चर्चेदरम्यान बोलताना प्रियंका गांधी यांनी 2001 मध्ये संसदेचे रक्षण करताना प्राण गमावलेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहिली. "कोट्यवधी भारतीयांच्या संघर्षात, कठीण परिस्थितीशी लढण्याच्या बळावर आणि देशाकडून न्याय मिळण्याच्या अपेक्षेने, आपल्या संविधानाची ज्योत तेवत आहे. आपली राज्यघटना म्हणजे 'सुरक्षा कवच' आहे. 'सुरक्षा कवच' जे नागरिकांना सुरक्षित ठेवते - ते न्यायाचे, ऐक्याचे, अभिव्यक्तीच्या अधिकाराचे 'कवच' आहे. मात्र 10 वर्षे सत्ताधारी पक्षाच्या सहकाऱ्यांनी हे 'कवच' मोडीत काढण्याचा प्रयत्न केला आहे. खाजगीकरण करुन, हे सरकार आरक्षण कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहे,” असंही प्रियंका गांधी म्हणाल्या.
प्रियांका गांधी यांनी लोकसभेत जात जनगणनेबाबत सरकारच्या भूमिकेवर टीका केली. "जातीची जनगणना ही काळाची गरज आहे, तरीही ते मंगळसूत्रांवर चर्चा करून त्याचे तुच्छीकरण करतात. आज देशातील जनता जात जनगणना व्हावी, अशी मागणी करत आहे. लोकसभा निवडणुकीतील या निकालांमुळेच जात जनगणना आवश्यक आहे. जेणेकरून प्रत्येकाची स्थिती जाणून घेता येईल.
वायनाडच्या खासदार प्रियंका गांधी पुढे म्हणाल्या, "दिवंगत पंतप्रधान नेहरू ज्यांचे नाव घेताना तुम्ही कधी कधी संकोच करता, इतर वेळी स्वत:ला वाचवण्यासाठी त्यांचा वापर करत. पण त्यांनी HAL, BHEL, SAIL, GAIL, ONGC, NTPC, रेल्वे, IIT, आयआयएम, ऑइल रिफायनरीज आणि अनेक पीएसयू त्यांनी निर्माण केल्या. त्या तुम्ही विकू शकता मात्र, त्याचा इतिहास पुस्तकांमधून पुसला जाऊ शकत नाही. तसंच स्वातंत्र्य संग्रामातील त्यांची भूमिका, हे राष्ट्र घडवताना त्यांनी केलेली कामगिरी कधीही पुसली जाऊ शकत नाही."