नवी दिल्ली- छत्तीसगडमधील विजापूर येथील पत्रकार मुकेश चंद्राकर यांच्या हत्येतील मुख्य आरोपी सुरेश चंद्राकर याला एसआयटीने हैदराबाद येथून अटक केलीय. सुरेश चंद्राकर हे व्यवसायाने कंत्राटदार असून, ते काँग्रेसचे सदस्यही आहेत. मुकेश चंद्राकर आणि सुरेश चंद्राकर हे नातेवाईक आहेत. मुकेश चंद्राकर यांनी भ्रष्टाचाराचे प्रकरण उघडकीस आणले होते, त्यानंतर सुरेशने त्यांची हत्या केली होती. हे प्रकरण 3 जानेवारी रोजी उघडकीस आले. तेव्हापासून पोलीस सुरेश चंद्राकरचा शोध घेत होते. पोस्टमॉर्टेम रिपोर्टनुसार, मुकेशच्या यकृतावर खोल जखम झाल्याचं आढळलंय. 5 हाडं तुटली, डोक्यात 15 फ्रॅक्चर, हृदय फुटलेलं अन् मान तुटलेली आढळली होती. 12 वर्षांच्या कारकिर्दीत असे हत्याकांड कधीच पाहिले नसल्याचंही डॉक्टरांनी सांगितलंय.
एसआयटी हैदराबादला गेली होती : या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली होती. आरोपीला पकडण्यासाठी एसआयटीचे पथक हैदराबादला रवाना झाले होते. तेथे रविवारी रात्री उशिरा आरोपीला अटक करण्यात आली. सुरेशचा भाऊ रितेश चंद्राकर आणि दिनेश चंद्राकर यांच्यासह एका सुपरवायझरला यापूर्वीच अटक करण्यात आलीय. 33 वर्षीय मुकेश चंद्राकर हे फ्रीलान्स करणारे पत्रकार होते. 1 जानेवारी रोजी ते बेपत्ता झाले होते. 3 जानेवारी रोजी मुकेश यांचा मृतदेह विजापूर शहरातील छतनपारा बस्तीमधील सुरेश चंद्राकर याच्या मालकीच्या मालमत्तेत असलेल्या सेप्टिक टँकमधून सापडला होता. सुरेशवरही खुनाचा आरोप होता.
आरोपी ड्रायव्हरच्या घरात लपला होता : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश चंद्राकर हैदराबाद येथील त्याच्या ड्रायव्हरच्या घरी लपून बसला होता. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी 200 हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि सुमारे 300 मोबाईल नंबर ट्रॅक केले. सुरेश चंद्राकर याची अद्याप चौकशी सुरू आहे. यापूर्वी सुरेश चंद्राकर याची चार बँक खाती गोठवण्यात आलीय. सुरेश चंद्राकर याच्या पत्नीचीही कांकेर जिल्ह्यात कोठडीत चौकशी सुरू आहे.
सेप्टिक टँकमध्ये मृतदेह टाकला : प्राथमिक तपासानुसार, पत्रकार मुकेश चंद्राकर यांच्यासोबत रात्रीच्या जेवणावरून वाद झाल्यानंतर त्याचा नातेवाईक रितेश आणि महेंद्र यांनी त्याच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला. दोघांनी त्याचा मृतदेह सेप्टिक टँकमध्ये टाकून तो सिमेंटने बंद केला. कोणताही पुरावा मागे राहू नये म्हणून त्यांनी मुकेशचा फोन आणि लोखंडी रॉडही नष्ट केले. तिसरा आरोपी दिनेश टाकी सील करत असताना त्यावर लक्ष ठेवून होता. कंत्राटदार सुरेश चंद्राकर हा या हत्येचा सूत्रधार असल्याचे बोलले जात आहे.
#UPDATE | Prime accused of journalist Mukesh Chandrakar's murder case, Suresh Chandrakar, who was absconding after the crime, has been detained. The accused was detained from Hyderabad late last night by the SIT and he is being questioned: Bastar Police https://t.co/CFFLm5QtJ2
— ANI (@ANI) January 6, 2025
एक कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी : छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिलंय. त्याच वेळी राज्यातील पत्रकारांनीही या घटनेविरोधात संताप व्यक्त केला. आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. याशिवाय मुकेश चंद्राकर यांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची आर्थिक मदत आणि शहिदाचा दर्जा देण्याची मागणीही करण्यात आलीय. मुकेश यांच्या हत्येच्या निषेधार्थ कोंडागाव येथे पत्रकारांनी मूक रॅली काढून मेणबत्त्या पेटवून श्रद्धांजली वाहिली.
हेही वाचाः
प्रशांत किशोर यांना कानशिलात लगावून अटक केल्याचा आरोप, आज न्यायालयात हजर करण्यात येणार