कोल्हापूर- बीड सरपंच हत्या प्रकरणातील सीसीटीव्ही समोर आल्यानंतर मुख्य संशयित वाल्मिक कराडसह त्याच्या सहकाऱ्यांच्या अडचणी वाढत असताना आता स्वराज्य पक्षाचे संस्थापक आणि माजी खासदार संभाजीराजेंनी राज्य सरकारवर तोफ डागलीय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या प्रकरणात कराडसह त्यांच्या सहकाऱ्यांना संरक्षण देत आहेत का, असं म्हणत अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडेंना मंत्रिपदाचा गोडवा कशासाठी, असा सवालही संभाजीराजेंनी उपस्थित केलाय, ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.
आरोपींवर 302 अंतर्गत हत्येचा गुन्हा नोंद करावा : मी अजून सीसीटीव्ही फुटेज पाहिलेलं नाही. मात्र माझ्या कानावर काही गोष्टी आलेल्या आहेत. व्हिडीओच्या माध्यमातून या हत्या प्रकरणाचं कनेक्शन बऱ्यापैकी स्पष्ट होत आहे म्हणूनच आमची सरकारकडे मागणी आहे की, आरोपींवर मकोकाच्या अंतर्गत जो गुन्हा दाखल केलाय, त्याऐवजी 302 अंतर्गत हत्येचा गुन्हा नोंद करण्यात यावा, याशिवाय पर्याय नसल्याचंही संभाजीराजेंनी सांगितलंय. तसेच धनंजय मुंडे राज्य मंत्रिमंडळात मंत्री राहणंदेखील बरोबर नाही, या सर्व गोष्टी टप्प्याटप्प्याने समोर येणार आहेत, असंही संभाजीराजे छत्रपती म्हणालेत.
धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा : मंत्री धनंजय मुंडे फार मोठमोठं बोलतात, मात्र त्यांनी नैतिकदृष्ट्या राजीनामा द्यायला हवा. वाल्मिक कराडनं आपलं वटमुखत्यारपत्र धनंजय मुंडेंना दिलंय, यापेक्षा आणखी काय हवं? राज्यातच नव्हे तर देशात चर्चा सुरू आहे, तरीदेखील तुम्हाला मंत्रिपदाच्या खुर्चीवर बसायचा आहे का? असा सवाल उपस्थित करत माझा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना प्रश्न आहे की, जर मुंडे स्वच्छ प्रतिमेचे आहेत ना मग त्यांना पालकमंत्रीची जबाबदारी का देण्यात आली नाही, मात्र ते दोषी आहेत म्हणूनच त्यांना पालकमंत्रिपद दिलेलं नाही. हत्या होऊन दीड महिना उलटला तरीही अजूनही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नकळत वाल्मिक कराडला प्रोटेक्शन देत आहेत, तुम्ही अजूनही वाल्मिक कराडवर गुन्हा नोंद करीत नाहीत. सरकारने लवकरात लवकर पारदर्शीपणे खुनाचा गुन्हा दाखल करून धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी यावेळी केलीय.
...म्हणून त्यांनी मंत्रिपद सोडलेलं नाही : धनंजय मुंडे यांचे नाव घ्यायला सर्वजण सुरुवातीला घाबरत होते, मात्र मी सुरुवातीला मुंडेंनी राजीनामा द्यावा ही मागणी केली होती, आता सर्व समोर येत आहे, यामुळे मी केलेली मागणी खरी होतेय, त्यांना पालकमंत्रिपद दिले नाही, याचा मला आनंद आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मागे धनंजय मुंडे पालकमंत्रिपद सांभाळणार का? हे येत्या काळातच समजणार आहे, त्यांना पालकमंत्रिपदामध्ये इंटरेस्ट आहेच म्हणून त्यांनी मंत्रिपद सोडलेलं नाही, अन्यायाच्या विरोधात न्यायासाठी लढा देण्याची जबाबदारी माझी असते, त्यांना किती भांडायचं भांडू दे, मात्र यामुळे वातावरण गढूळ होत आहे, असंही संभाजीराजे छत्रपती म्हणालेत.
विशाळगडाची पुनरावृत्ती टाळण्याची जबाबदारी सरकारची : छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले हे आपले जीवन स्मारक आहेत, या गडकोट किल्ल्यांमुळेच हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली म्हणून सरकारने घेतलेल्या निर्णयाचं स्वागत करतो, मात्र सरकारने खबरदारी घेणं आवश्यक आहे. विशाळगडाचे अतिक्रमण काढायला मी गेलो, तेव्हा माझा कोणताही हस्तक्षेप नसताना आणि कायदा हातात न घेता तेथे अनेक गोष्टी घडल्या. ज्यामुळे वातावरण गढूळ झालं, दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण झाली, ते होऊ नये, याची सरकारने काळजी घ्यायला हवी, गडावर व्यावसायिक अतिक्रमण राहता कामा नये हे माझं स्पष्ट मत आहे. मात्र विशाळगडाला जे काही झालं ते पुन्हा कुठे होऊ नये, याची सरकारने काळजी घ्यायला पाहिजे, असंही संभाजीराजे छत्रपती म्हणालेत.
हेही वाचा :