छत्तीसगड- विजापूरमध्ये नक्षलवाद्यांनी मोठा हल्ला केला असून, सुरक्षा दलाच्या वाहनाला IEDने लक्ष्य करण्यात आलंय. नक्षलवाद्यांनी कुटरू रोडवर IED बॉम्ब पेरला होता, सुरक्षा दलाचे वाहन तिथे आल्यानंतर हा स्फोट झाला. IED स्फोटात 9 जवान शहीद झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तसंच 6 हून अधिक जवान गंभीर जखमी झालेत. जवानांचं पथक ऑपरेशन करून परतत होते. दंतेवाडा, नारायणपूर आणि विजापूरचे संयुक्त ऑपरेशन दल ऑपरेशननंतर परतत असताना नक्षलवाद्यांनी विजापूर जिल्ह्यातील कुटरू-बेद्रे रस्त्यावर हा हल्ला केला.
आयईडीचा स्फोट करून सुरक्षा दलाचे वाहन उडवले : जवळपास दुपारी 2:15 वाजताच्या सुमारास नक्षलवाद्यांनी कुटरू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आंबेली गावाजवळ आयईडीचा स्फोट करून सुरक्षा दलाचे वाहन उडवले. बस्तरचे आयजी यांनी दिलेल्या माहितीनुसार, नक्षलवाद्यांनी विजापूरमध्ये आयईडी स्फोटाने सुरक्षा दलांची वाहने उडवून दिली. या हल्ल्यात आठ डीआरजी जवान आणि दंतेवाडा येथील एका चालकासह नऊ जवानांना वीरमरण आलं. सुरक्षा दल दंतेवाडा, नारायणपूर आणि विजापूर येथे संयुक्त कारवाई करून परतत होते.
आतापर्यंत 5 नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले : बस्तरचे आयजी पी. सुंदरराज यांनी सांगितले की, दंतेवाडा, विजापूर आणि नारायणपूर जिल्ह्यांतील सीमावर्ती भागात गेल्या तीन दिवसांपासून नक्षलवाद्यांविरोधात कारवाई सुरू आहे. यामध्ये 5 नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले असून, आमचा एक जवान शहीद झालाय. त्यानंतर आमची टीम परतत असताना विजापूरच्या आंबेली भागात नक्षलवाद्यांनी आयईडी बॉम्ब पेरला होता, सुरक्षा दलाचे वाहन त्या ठिकाणी आल्यानंतर त्याचा स्फोट घडवण्यात आला. त्यात 8 जवान आणि एक चालक शहीद झाला.
नक्षलवाद संपवण्याचा आमचा लढा सुरूच राहणार : आयईडी स्फोटावर मुख्यमंत्री विष्णू देव साई म्हणाले की, विजापूरच्या कुटरू येथे नक्षलवाद्यांनी केलेल्या आयईडी स्फोटात 8 जवान आणि एक चालक शहीद झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे. शहीद जवानांच्या कुटुंबीयांसोबत माझ्या संवेदना आहेत. शहीद जवानांच्या आत्म्याला शांती मिळो आणि शोकाकुल कुटुंबीयांना देव बळ देवो, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. नक्षलवादी हतबल आहेत आणि त्यामुळेच ते अशा प्रकारचे भ्याड हल्ले करीत आहेत. जवानांचे हौतात्म्य व्यर्थ जाणार नाही. नक्षलवाद संपवण्याचा आमचा लढा जोरदार सुरू राहील, असंही त्यांनी सांगितलं.
सरकार घाबरणार नाही आणि झुकणार नाही : छत्तीसगड विधानसभेचे अध्यक्ष रमण सिंह यांनी विजापूर आयईडी स्फोटावर म्हटले की, जेव्हा जेव्हा नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली जाते, तेव्हा ते अशी भ्याड कृत्ये करतात. नक्षलवादाच्या विरोधात छत्तीसगड सरकार जी पावले उचलत आहे, ती आणखी तीव्र केली जाणार आहेत. सरकार घाबरणार नाही आणि झुकणार नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई सुरूच राहणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.
जवानांच्या हौतात्म्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही : छत्तीसगड सरकारचे उपमुख्यमंत्री अरुण साओ यांनी आयईडी स्फोटाला नक्षलवाद्यांचे भ्याड कृत्य म्हटले आहे. अरुण साओ म्हणाले की, नक्षलवाद्यांच्या भ्याड कृत्याची माहिती विजापूरमधून आलीय. नक्षलवाद्यांचे हे भ्याड कृत्य आहे. जवानांच्या हौतात्म्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. लवकरच छत्तीसगड नक्षलमुक्त होईल, असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला.
सुरक्षा दलांना मारण्यासाठी नक्षलवाद्यांनी यापूर्वी केलेले शक्तिशाली IED स्फोट
- 3 जानेवारी 2025: विजापूरमध्ये नक्षलवाद्यांनी पेरलेल्या प्रेशर इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईसचा (आयईडी) स्फोट होऊन तीन जिल्हा राखीव रक्षक (DRG) सैनिक जखमी झाले.
- 24 नोव्हेंबर 2024: छत्तीसगडच्या सुकमा येथे नक्षलवाद्यांनी पेरलेल्या इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाईसचा (आयईडी) स्फोट, जिल्हा राखीव रक्षक हवालदार जखमी.
- 29 सप्टेंबर 2024: छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाईसचा (आयईडी) स्फोट, एका अधिकाऱ्यासह पाच सीआरपीएफ जवान जखमी झाले.
- 25 फेब्रुवारी 2024: छत्तीसगड सशस्त्र दलाच्या (CAF) एका हेड कॉन्स्टेबलला विजापूर जिल्ह्यात माओवाद्यांनी पेरलेल्या प्रेशर इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईसने (IED) धडक दिली आणि त्याचा मृत्यू झाला.
- 19 ऑक्टोबर 2024: दोन इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस (ITBP) सैनिक शहीद झाले आणि दोन पोलिस जखमी झाले. माओवाद्यांनी छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यातील मोहंडी गावाजवळ स्फोट घडवून आणला जेव्हा सुरक्षा दल अबुझमद भागात माओवादविरोधी कारवाईतून परतत होते.
- 17 जुलै 2024: बस्तरच्या विजापूर जिल्ह्यातील जंगलात माओवादी विरोधी कारवाईदरम्यान आयईडी स्फोट झाला, ज्यामध्ये दोन सुरक्षा कर्मचारी मरण पावले आणि चार जखमी झाले.
- 26 एप्रिल 2023: दंतेवाडा येथे सुरक्षा कर्मचारी प्रवास करत असलेल्या वाहनात झालेल्या स्फोटात 10 सैनिक आणि एका नागरिक चालकाचा मृत्यू झाला.
- 27 मार्च 2023: CAF च्या सहाय्यक प्लाटून कमांडरचा विजापूरमध्ये IED स्फोटात मृत्यू झाला.
- 08 फेब्रुवारी 2022: विजापूर जिल्ह्यात माओवाद्यांनी घडवून आणलेल्या इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस (IED) स्फोटात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (CRPF) 4 जवान जखमी झाले.
- 04 मार्च 2021 (झारखंड): झारखंडच्या पश्चिम सिंहभूम जिल्ह्यातील जंगलात IED स्फोट झाला, ज्यामध्ये 3 सुरक्षा कर्मचारी ठार झाले आणि दोन जखमी झाले.
- 01 मे 2019 (महाराष्ट्र): महाराष्ट्रातील गडचिरोली येथे नक्षलवाद्यांनी आयईडीचा स्फोट केला, जेव्हा राज्य पोलिसांचे एक द्रुत प्रतिक्रिया पथक (क्यूआरटी) माओवाद्यांनी सुमारे 30 वाहने जाळली होती. या घटनेत किमान 15 सुरक्षा कर्मचारी आणि एका नागरिकाचा मृत्यू झाला.
- 13 मार्च 2018: माओवाद्यांनी छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात भूसुरुंगाचा स्फोट केला, ज्यात 09 CRPF जवान शहीद झाले आणि दोन गंभीर जखमी झाले.
- 27 ऑक्टोबर 2018: नक्षलवाद्यांनी विजापूर जिल्ह्यात भूसुरुंगाने एमपीव्ही उडवली. केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) चार जवान शहीद झाले असून दोन जखमी झाले आहेत.
- 11 मार्च 2017: सुकमा येथे सीरियल आयईडी स्फोटात 12 सीआरपीएफ जवान शहीद झाले.
- 02 फेब्रुवारी 2017 (ओडिशा): 07 ओडिशा पोलिस कर्मचाऱ्यांचे वाहन अपघातात मरण पावले. कोरापुट जिल्ह्यातील सुंकी जवळ NH 26 वर माओवाद्यांनी केलेल्या भूसुरुंगाच्या स्फोटात हे वाहन उडवण्यात आले. हे वाहन पोलिस विभागातील काही सहाय्यक चालकांना घेऊन कटककडे जात होते. या गाडीत चालकासह 13 प्रवासी होते.
हेही वाचा :