कोलकाता Justice Abhijit Gangopadhyay : कोलकत्ता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभिजित गंगोपाध्याय हे लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. मंगळवारी 5 मार्चला राजीनामा देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. न्यायमूर्ती गंगोपाध्याय यावर्षी ऑगस्टमध्ये निवृत्त होणार आहेत.
माझा आत्मा मला सांगत आहे : रविवारी न्यायाधीश गंगोपाध्याय म्हणाले की, "माझा आत्मा मला सांगत आहे की, माझा न्यायाधीश म्हणून कार्यकाळ संपलाय. मी कोणत्याही डाव्या पक्ष, काँग्रेस किंवा भाजपामध्ये सामील होऊन लोकसभा निवडणूक लढवू शकतो. मी मंगळवारी माझा राजीनामा राष्ट्रपती, सरन्यायाधीश आणि उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांकडे पाठवणार आहे." यादरम्यान त्यांनी टीएमसीचे आभार मानले. तृणमुलनं त्यांना राजकारणात येण्याचं वारंवार आव्हान दिलं होतं.
राजीनामा दिल्यानंतर पत्रकार परिषद घेणार : न्यायाधीश गंगोपाध्याय यांनी पश्चिम बंगालच्या सरकारी आणि अनुदानित शाळांमधील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या भरतीतील अनियमिततेच्या आरोपांसह राज्यातील किमान 14 प्रकरणांची केंद्रीय संस्थांकडून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळं ते आजवर सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या निशाण्यावर राहिले आहेत. राजीनामा पाठवल्यानंतर दुपारी मास्टरदा (सूर्य सेन) यांच्या पुतळ्याखाली पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यात ते राजीनाम्याचे कारण आणि भविष्यातील योजना सांगतील, असंही त्यांनी सांगितलं.